सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शाही स्नानाच्या मार्गात बदल करून दुर्घटना होणार नाही, या दृष्टीने पर्यायी मार्गाबाबत प्रशासनाने साधु-महंतांची संमती मिळवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केल्यामुळे आगामी सिंहस्थात नवीन की पारंपरिक जुन्या शाही मार्गाचा वापर केला जाणार यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कायमस्वरूपी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचनाही त्यांनी केली.
सिंहस्थ कुंभमेळ्यासंबंधीच्या पूर्वतयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उच्चाधिकार समितीने घेतलेले निर्णय, त्या अनुषंगाने सुरू असलेली कामे, विहित कार्यमर्यादा अशा अनेक मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, माजी मंत्री छगन भुजबळ, महापौर अशोक मुर्तडक, प्रधान सचिव श्रीकांत सिंह, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, पालिका आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी विलास पाटील, शहरातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुख्य सचिव क्षत्रिय यांनी प्रशासनातर्फे केल्या जाणाऱ्या विकास कामांची माहिती दिली.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी बाकी आहे. कुंभमेळ्यास लाखो भाविक उपस्थित राहणार असल्याने प्रशासनातर्फे विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. या पायाभूत सुविधा निर्माण करताना कामाचा दर्जा आणि वेळेचे बंधन याचा समन्वय साधून निर्धारित वेळेत आराखडय़ानुसार कामे पूर्ण करावीत, अशी सूचना फडणवीस यांनी केली. राज्य शासन विकास कामांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देईल. केंद्राकडूनही मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.
रमणी समितीच्या शिफारशीनुसार शाही मार्गाचे रुंदीकरण पूर्णत्वास गेलेले नाही. अतिक्रमण हटविण्याचा मुद्दाही रखडला आहे. या मार्गाचे रुंदीकरण दृष्टिपथास न आल्यास गर्दीचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक बाब आहे. यावर स्थानिक पातळीवर आधी बरीच चर्चा झडली आहे. हा धोका टाळण्यासाठी मागील सिंहस्थात नवीन शाही मार्ग तयार करण्यात आला. तथापि, त्याचा वापर करण्यास साधु-महंतांनी नकार देऊन जुन्या पारंपरिक मार्गाचा वापर केला.
अतिशय गजबजलेल्या भागातून जाणाऱ्या या मार्गावर गर्दीचे व्यवस्थापन जिकिरीचे काम आहे. शाही मिरवणुकीवेळी चेंगराचेंगरी होऊन ३३ भाविक मृत्युमुखी पडण्याची घटना घडली होती. या पाश्र्वभूमीवर, सिंहस्थातील शाही स्नानाचा मार्ग या विषयावर बैठकीत चर्चा झाली. शाही स्नानाच्या मार्गात बदल करून दुर्घटना होणार नाही या दृष्टीने पर्यायी मार्गाविषयी साधु-महंतांशी चर्चा करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. जुना पारंपरिक शाही मार्गाचा वापर न करता इतर पर्यायी मार्गाचा वापर केला जावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पुढील काही दिवसात यासंबंधी साधु-महंतांशी पुन्हा चर्चा केली जाऊ शकते.
साधुग्राम साकारण्यासाठी ३२५ एकर जागेचे तात्पुरते अधिग्रहण आवश्यक आहे. यासाठी न्यायालयीन प्रकरणांबाबत राज्याचे महाअभियोक्ता शासनाची बाजू मांडतील. तसेच गोदावरी नदीवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या घाटांच्या सौंदर्यीकरणाचे कामही वेळेत पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर व नाशिक येथील स्वच्छतेला प्राधान्य देऊन नदी पात्रातील पाणी स्वच्छ राहील यासाठी तातडीने उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. नाशिक येथील विमानतळाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांसमवेत लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्यात येईल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

सिंहस्थाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर
सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन तसेच पूर्वतयारीची संपूर्ण जबाबदारी तसेच प्रभारी मंत्री म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाजन यांच्याकडून संपूर्ण कामाचे नियोजन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. नाशिक महापालिकेकडे निधीची कमतरता आहे. यामुळे विकास कामे पूर्ण करण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे राज्य शासनाने अतिरिक्त भार उचलावा, तसेच रस्ते, पूल, आरोग्य सुविधा, पोलीस चौकी, सिंहस्थ कुंभमेळ्याचे निर्धारित काम पूर्ण करण्यासाठी निश्चित कालावधी ठरवावा, अशी सूचना माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली.