आयटम साँग नको..नको म्हणत दूर पळणाऱ्या अभिनेत्रींच्या गळी ते उतरवणे ही कला तमाम बडय़ा चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना साध्य झाली आहे. त्यामुळे कतरिना, करिनापाठोपाठ प्रियांका चोप्राही आयटम गर्लच्या यादीत सामील झाली आहे. अर्थात, प्रियांकाला आयटम साँगसाठी राजी करायला दिग्दर्शक संजय गुप्ताला सहा महिने पाठपुरावा करावा लागला. ‘शूटआऊट अ‍ॅट वडाला’ या चित्रपटासाठी प्रियांका आयटम साँग करणार असून आठवडाभरात त्याचे चित्रिकरण पूर्ण होईल, अशी माहिती दिग्दर्शक संजय गुप्ताने दिली आहे.
मुंबईतील अंडरवर्ल्ड आणि दाऊदचा उदय या सगळ्या सत्य घटनांचे चित्रण ‘शूटआऊट अ‍ॅट वडाला’ या चित्रपटात करण्यात आले आहे. मुंबईतील सगळे गँगस्टर आणि इथली टपोरी संस्कृती चित्रपटात आहे म्हटल्यावर त्याचप्रकारचे आयटम साँगही हवे, अशी संजय गुप्ताची इच्छा होती.
तेव्हापासून त्याने प्रियांका चोप्राचा पाठपुरावा सुरू केला पण, प्रियांका काही त्याला दाद देत नव्हती. अखेर, सहा महिन्यांनी दोन अटींवर प्रियांका आयटम साँग करण्यासाठी राजी झाली. या अटी आहेत, आक्षेपार्ह विधाने असलेले आणि द्वयर्थी शब्द असलेले गाणे नको. संजयने तिची ही अट मान्य के ली आणि तिच्यासमोर दोन गाण्यांचे पर्याय ठेवले. प्रियांकाने स्वत:च त्यातील ‘बबली बदमाष’ हे गाणे आयटम साँग म्हणून निवडले.
‘बबली बदमाष’ या गाण्याला संगीतकार अन्नू मलिकने संगीत दिले आहे. सत्तरच्या दशकातील क्लब संगीताचा ताल या गाण्याला देण्यात आला असल्याची माहिती संजय गुप्ताने दिली. याआधी कतरिना आपल्या ‘शीला की जवानी’ या आयटम साँगमुळे, करिना ‘फेविकॉल से’मुळे तर विद्या बालनही ‘मला जाऊ दे..’ या लावणीमुळे लोकप्रिय झाली आहे. आता प्रियांकाही या गाण्यामुळे नक्कीच ‘बबली बदमाष’ म्हणून लोकप्रिय होईल, याबद्दल चित्रपटाची निर्माती एकता कपूरला कोणतीही शंका वाटत नाही.