मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे एका गरीब विधवा महिलेचे ग्रामसेवकाने पाडून टाकलेले पत्र्याचे घर व जप्त केलेल्या संसारोपयोगी वस्तू परत मिळण्यासाठी सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. अखेर त्याची दखल घेत त्या गरीब महिलेच्या संसारोपयोगी वस्तू परत करण्याचा, तसेच दोन गुंठे जागा देण्याचा आदेश जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी दिला. त्यानुसार तिला तातडीने संसारोपयोगी वस्तू परत देण्यात आल्या. तब्बल सात महिने संघर्ष केल्यानंतर या महिलेला न्याय मिळाला.
शोभा शिंदे या विधवा गरीब महिलेने निवाऱ्यासाठी गावात पत्र्याचे शेड उभारले होते. याच ठिकाणी ती राहत असे. परंतु स्थानिक राजकारणातून गावचे सरपंच व ग्रामसेवकांनी या महिलेचे घर अतिक्रमण असल्याचा शोध लावत पत्र्याचे शेड पाडून टाकत तिच्या ताब्यातील संसारोपयोगी वस्तूही जप्त केल्या होत्या. याबाबत तिने जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा मोहोळ तालुका पंचायत समितीचे सदस्य प्रभाकर देशमुख यांच्याकडे दाद मागितली. तेव्हा संघटनेने या प्रश्नावर पाठपुरावा केला असता त्यास प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे आंदोलन करावे लागले. तेव्हा त्याची दखल घेत जिल्हाधिकारी मवारे यांनी सदर गरीब विधवा महिलेचा निवारा हिरावून न घेण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र त्यानुसार पुढे कार्यवाही होत नव्हती. अखेर सात महिन्यांनी प्रशासनाला जाग आली. शोभा शिंदे यांच्या संसारोपयोगी वस्तू त्यांना परत करण्यात आल्या. तसेच त्यांना गावात दोन गुंठे जागा निवाऱ्यासाठी देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असता त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्यासह त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर पाटील, मुकुंद ढेरे, कुमार गोडसे, विकास जाधव, ज्ञानदेव कदम, हरिनाना घोडकेनी पाठपुरावा केला होता.