दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अस्थिकलश उद्या (मंगळवार) नगर जिल्ह्य़ात दर्शनासाठी आणण्यात येणार आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागात दोन कलश ठेवण्यात येणार असून दि. २३ ला सायंकाळी प्रवरासंगम येथे दोन्ही अस्थिकलशांचे विसर्जन करण्यात येणार आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले चार दिवस जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्यात हे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. सजवलेल्या रथातून अस्थिकलश तालुक्याच्या ठिकाणी नेण्यात येणार आहेत. उद्याच नगरला सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. उद्या (मंगळवार) दुपारी ३ वाजता यशवंतराव सहकार सभागृहात ही शोकसभा होणार आहे. अस्थिकलश तोपर्यंत येथे आले तर येथेच ते दर्शनासाठी ठेवण्यात येतील असे गाडे यांनी सांगितले. उद्याच सायंकाळी राहुरी येथे अस्थिकलश ठेवण्यात येणार आहे.
दि. २१ ला जामखेड, कोल्हार, कर्जत, अकोले, श्रीगोंदे आणि संगमनेर, दि. २२ ला पारनेर, कोपरगाव, नगर शहर, नगर तालुका, शिर्डी आणि राहाता, दि. २३ ला पाथर्डी, देवळाली प्रवरा, शेवगाव, श्रीरामपूर, नेवासे आणि टाकळीभान याप्रमाणे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येतील. यावेळी पक्षाचे सर्व तालुकाप्रमुख, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यात स्थानिक पातळीवरील भजनी मंडळेही सहभागी होते. दि. २३ ला दोन्ही अस्थिकलशांचे प्रवरासंगम येथे विसर्जन करण्यात येईल, असे गाडे यांनी सांगितले. उपजिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, अनिल कराळे, संदेश कार्ले आदी यावेळी उपस्थित होते.