रंगतदार ‘कणेकरी’ मैफल
पत्रकार म्हणून अनेक वर्षे नोकरी केल्यानंतर ललित, विनोदी, क्रिकेट ते बॉलिवूड अशा अनेक विषयांवर विपुल लेखन, स्तंभलेखन आणि एकपात्री कार्यक्रमांतून ‘फटकेबाजी’ करणाऱ्या शिरीष कणेकर यांची ‘कणेकरी’ मैफल अलीकडेच पत्रकार संघात रंगली. भन्नाट किस्से आणि आठवणींची ‘चंची’ उघडून कणेकरांनी अनेक हास्यस्फोट घडविले..
कणेकर यांच्या लेखन कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पत्रकार संघाने त्यांचा वार्तालाप आयोजित केला होता. वांद्रे येथे झालेल्या कथित बलात्काराच्याआपण दिलेल्या बातमीमुळे मागे लागलेला चौकशीचा ससेमिरा, खटला, त्यामुळे झालेला मनस्ताप, पोलिसी चौकशीचा खाक्या अशा अनेक आठवणी त्यांनी जागविल्या. एखादी बातमी तुम्हाला कोणीही दिलेली असो, त्या बातमीमुळे अगदी भूकंप घडण्याची शक्यता असली, आपले नाव होईल असे वाटत असले तरीही हातात आलेल्या बातमीची संपूर्ण खातरजमा केल्याशिवाय ती बातमी देऊ नका, असा सल्ला त्यांनी  नवोदित पत्रकारांना दिला.
‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये रिपोर्टर म्हणून काम करताना कार्यालयातील सहकारी, मुख्य वार्ताहर आदींचे काही गंमतीदार किस्सेही कणेकर यांनी या वेळी खास त्यांच्या शैलीत सांगून हास्याचे फवारे उडवून दिले. मी जेव्हा पत्रकारिता करत होतो तेव्हा आम्हाला सगळ्यांना एक शिस्त होती. आमच्या वरिष्ठांना आम्ही घाबरत होतो. एखादी घटना, प्रसंग घडल्यानंतर त्याच्या पाठपुराव्याच्या बातम्या करण्यासाठी आम्हाला खूप धावपळ करावी लागायची, असे अनुभवाचे बोल त्यांना सांगितले. पत्रकारितेबरोबरच क्रिक्रेट, चित्रपटसृष्टी आणि एकपात्री प्रयोगाच्या निमित्ताने आलेल्या विविध अनुभवांचा पट कणेकर यांनी या गप्पांच्या निमित्ताने उलगडला.