आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांनाच उमेदवारी देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका खासगी बैठकीत केल्याचा संदेश आमदारपुत्र नगरसेवकाने व्हॉट्सअ‍ॅपवर टाकल्याने शिवसेना नगरसेवक हिरमुसले आहेत. ही घोषणा कधी, केव्हा झाली याचा शोध ते घेऊ लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांचा ‘कामाला लागा’ असा आदेशवजा निरोप मिळालेले नगरसेवकही त्यामुळे बुचकळ्यात पडले आहेत. तर उमेदवारी मिळणार नसेल तर कामे तरी कशाला करायची अशी चिंता काहींना पडली आहे.
शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीमधील नेते आणि कार्यकर्ते अद्यापही लोकसभा निवडणुकीतील यशातच गुरफटले आहेत. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही घवघवीत यश हाती लागेल, असा विचार महायुतीतील प्रत्येकाच्या मनात घोळत आहे. परिणामी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यात नगरसेवकांचाही समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांनी निवडक नगरसेवकांशी संपर्क साधला होता. ‘आता कामाला लागा’ असा निरोप मिळाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचा समज नगरसेवकांचा झाला आणि ते आळस झटकून कामाला लागले. नगरसेवक निधीतून करता येतील तेवढी कामे मंजूर करून घेण्यासाठी हे नगरसेवक पालिका अधिकऱ्यांना वेठीस धरू लागले होते. पालिकेच्या तिजोरीतून अतिरिक्त निधी मिळविण्यासाठीही त्यांनी खटपट सुरू केली होती.
पालिकेच्या कामाची आणि इतर घडामोडींची माहिती मिळावी यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर नगरसेवकांचा एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. एका आमदारपुत्र नगरसेवकाने या ग्रुपवर गेल्या आठवडय़ात एक संदेश पाठवला आणि नगरसेवक आश्चर्यचकीत झाले. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीमध्ये विद्यामान आमदारांनाच विधानसभेची उमेदवारी देण्याची घोषणा केल्याचे या संदेशात म्हटले होते. हा संदेश वाचल्यानंतर ‘कामाला लागा’ असा निरोप मिळालेले नगरसेवक गोंधळात पडले. उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयाने दिलेला निरोप आणि आमदारपुत्र नगरसेवकाचा संदेश यातील खऱ्याखोटय़ाची खातरजमा करण्यासाठी शिवसेना वर्तुळात अनेकांनी परस्परांशी संपर्क साधला. पण त्यांच्या हाती मात्र काहीच आले नाही. नगरसेवकाने काम करायचे आणि त्याचे श्रेय आमदारांनी लाटायचे असा सर्वच पक्षांचा प्रघात आहे. या प्रकारामुळे नगरसेवकांमध्ये पूर्वीपासूनच असंतोष खदखदत आहे. त्यामुळे विद्यामान आमदारांनाच तिकीट मिळणार असेल तर आपण कामे तरी का करायची अशी कुजबूज या संदेशानंतर नगरसेवकांमध्ये सुरू झाली आहे.