पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेत आजवरचे मतभेद विसरून सर्वानी कामाला लागावे आणि संघटना मजबूत करण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे निर्देश शिवसेनेचे नूतन संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी दिले. सूर हरविलेल्या शिवसेनेची जिल्ह्यात नव्याने संघटनात्मक बांधणी करण्याकरिता आयोजित मिर्लेकर यांच्या दोन दिवसीय संवाद दौऱ्यास शुक्रवारी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत त्यांनी आधी नाशिक शहराकडे लक्ष केंद्रित करून प्रभागनिहाय बैठकांद्वारे सर्वसामान्य शिवसैनिकांशी संवाद साधला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, नाशिक जिल्ह्यातील मरगळलेल्या शिवसेनेत नवी जान फुंकण्यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न सुरू झाले असून, मिर्लेकर यांचा हा दौरा त्याचाच एक भाग ठरला आहे. शालिमार चौकातील शिवसेनेच्या कार्यालयात सकाळी मिर्लेकर यांचे शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले. याप्रसंगी आ. बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, पालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, माजी उपमहापौर अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, अॅड. शिवाजी सहाणे, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख सत्यभामा गाडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. मनसेच्या दणक्यामुळे गेल्या काही वर्षांत शिवसेनेची चांगलीच पिछेहाट झाली आहे. संघटनात्मक बांधणीपेक्षा पदाधिकाऱ्यांनी परस्परांवर कुरघोडी करण्यात धन्यता मानली. परिणामी, पक्षांतर्गत बेदिली माजली. हा सर्व घटनाक्रम लक्षात घेत मिर्लेकर यांनी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना धारेवर धरले. पक्षाची आंदोलने दिसत नाहीत. महिला आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संघटकपद गाडेकर यांच्याकडे आहे. त्यांना तुम्ही आपल्या कामाबद्दल समाधानी आहात काय, असा सवाल मिर्लेकर यांनी केला. पक्षात महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. महापालिकेत किती नगरसेविका आहेत, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. मिर्लेकर यांनी खडेबोल सुनावल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये कुजबुज सुरू झाली. त्यावरही त्यांनी टिप्पणी करत आतापर्यंत जे झाले ते विसरून सर्वानी संघटन बांधणीकडे लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना केली.
नाशिक लोकसभा मतदारसंघात चार तालुक्यांचा समावेश होतो. या मतदारसंघात संघटना बांधणीसाठी प्रभाग व विभागनिहाय बैठका घेण्यात येतील. नाशिक शहराकडे प्राधान्याने लक्ष दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीत ज्या ज्या मतदारसंघात शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला, त्या मतदारसंघाकडे तालुकानिहाय बैठका घेऊन लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्वसामान्य शिवसैनिक आपल्या अडचणी मांडण्यासाठी थेट आपल्याशी संपर्क साधू शकतात, असेही ते म्हणाले.
लवकरच महानगरप्रमुखाची नियुक्ती
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून नाशिक महानगरप्रमुखपदावरील नियुक्तीचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे मिर्लेकर यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे सव्वा वर्षांपासून शिवसेनेला महानगरप्रमुख व जिल्ह्याची कार्यकारिणी लाभलेली नाही. मध्यंतरी विभाग स्तरावरील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, परंतु महानगर कार्यकारिणी आणि तालुकाप्रमुखांची काही पदे रिक्त, तर काही पदांमध्ये फेरबदल केले जाणार आहे. या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त नावांची शक्य तितक्या लवकर घोषणा केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2013 रोजी प्रकाशित
संपर्कप्रमुखांनी घेतली शिवसेना पदाधिकाऱ्यांची झाडाझडती
पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेत आजवरचे मतभेद विसरून सर्वानी कामाला लागावे आणि संघटना मजबूत करण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे निर्देश शिवसेनेचे नूतन संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी दिले.
First published on: 27-04-2013 at 02:26 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena contact chief has fired to officers