शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवेसना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे पहिल्यांदाच, शुक्रवारी १४ डिसेंबरला नागपुरात येत आहेत. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शिवसेनेने मांडलेला अविश्वास प्रस्ताव, त्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची भारतीय जनता पक्षाची असलेली मिळमिळीत भूमिका आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध, शिवाजी पार्कमधील जागेचा आणि नामकरणाचा वाद, या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याला वेगळे महत्त्व आहे.
शुक्रवारी दुपारी १२ वाजता नागपूरला आल्यावर वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पूर्व आणि पश्चिम विदर्भातील पदाधिकारी आणि कार्यकत्याशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहे. यावेळी ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई, रामदास कदम, दिवाकर रावते व शिवसेना सचिव विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संपर्क दौरा सुरू केला असून त्याच शंृखलेत हिवाळी अधिवेशनातील त्यांची नागपूर भेट नियोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी, नागपुरात सेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत असून पूर्व आणि पश्चिम विदर्भातील आमदार, खासदार, माजी आमदार, संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, उपप्रमुख, तालुका प्रमुख, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह काही प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
गेल्या महिन्याभरापासून  विदर्भातील अनेक पदाधिकारी मुंबईला गेल्यावर त्यांचा उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद होऊ शकला नाही त्यामुळे सर्वाशी संवाद साधण्याच्या उद्देशाने नागपुरात येत असल्याचे संपर्क प्रमुख विनायक राऊत यांनी सांगितले. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे उद्धव ठाकरे विधिमंडळाच भेट देणार आहे की नाही याबाबत मात्र निश्चित कार्यक्रम ठरलेला नसल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांचा नागपुरात दौरा असल्यामुळे आणि शिवसेनेचे सर्व नेते नागपुरात असताना शहरात स्थानिक पदाधिकारी स्वागतासाठी  कामाला लागले आहे. दुपारी  १२ वाजता उद्धव ठाकरे नागपुरात आल्यानंतर सायंकाळच्या विमानाने मुंबईला परतणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठय़ा संख्येने उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी केले आहे.