शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश आज कोल्हापूरकरांच्या दर्शनासाठी प्रायव्हेट हायस्कूल येथे ठेवण्यात आला होता. तत्पूर्वी ताराराणी पुतळ्यापासून सजवलेल्या रथातून अस्थिकलश मिरवणुकीने नेण्यात आला. अस्थिकलशाचे दर्शन घेताना शिवसैनिकांसह सामान्य नागरिकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
काल मुंबई येथून सर्व जिल्ह्य़ांमध्ये सेनाप्रमुखांचा अस्थिकलश पाठविण्यात आला होता. बुधवारी सकाळी अस्थिकलश घेऊन आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह संजय पवार, विजय देवणे व मुरलीधर जाधव हे तीन जिल्हाप्रमुख कावळा नाका येथे आले. ताराराणी पुतळा येथे फुलांनी सजवलेल्या रथामध्येअस्थिकलश ठेवण्यात आला. या रथासमवेत संपर्क प्रमुख अरूण दुधवाडकर,आमदार क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार चंद्रकांतदादा पाटील तसेच तीन जिल्हाप्रमुख होते. मोठय़ा संख्येने जमलेले शिवसैनिक भगवे ध्वज घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. बाळासाहेब ठाकरे अमर रहे, अशा घोषणा देत मुख्य मार्गाने फिरून मिरवणूक प्रायव्हेट हायस्कूल येथे आली.  प्रायव्हेट हायस्कूल येथे नागरिकांना अस्थिकलशाचे दर्शन घेता यावे यासाठीची सोय केली होती. सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. दुपारनंतर तीन जिल्हाप्रमुख जिल्ह्य़ाच्या तिन्ही भागांत अस्थिकलश येथील नागरिकांच्या दर्शनासाठी घेऊन रवाना झाले होते. जिल्ह्य़ाच्या सर्व भागांतील लोकांना अस्थिकलशाचे दर्शन घेता यावे, याचे नियोजन केले आहे. बुधवार व गुरुवारी अशा दोन्ही दिवशी दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
दरम्यान शुक्रवारी अस्थिकलश पुन्हा कोल्हापुरात एकत्रित केले जाणार आहेत. कोल्हापूरजवळ असलेल्या प्रयाग चिखली या पंचगंगा नदीच्या संगमाच्या ठिकाणी अस्थिकलश आणले जाणार आहेत. तेथेच अस्थिकलशाचे विसर्जन करण्याचे नियोजन केले आहे.