जागतिक मराठी अकादमीचे ११ वे जागतिक मराठी संमेलन ‘शोध मराठी मनाचा’ १८ आणि १९ जानेवारी रोजी रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत.  
खातू नाटय़गृह, रत्नागिरी येथे होणाऱ्या या संमेलनात ‘समुद्रापलीकडे’ या कार्यक्रमात डॉ. अनिल नेरूरकर, प्रफुल्ल कुलकर्णी, राहुल गनबोटे, डॉ. विजय देशपांडे, गौरव फुटाणे, विश्राम गुप्ते ही परदेशात स्थायिक झालेली मराठी मंडळी सहभागी होणार आहेत. तर ‘लक्ष्मीची पावले’ या कार्यक्रमात अजय पित्रे, दीपक गद्रे, दिलीप भाटकर, उदय लोध हे मार्गदर्शन करणार आहेत. ‘नारबाची वाडी’ या चित्रपटाचे लेखक गुरू ठाकूर व दिग्दर्शक अजय सरपोतदार हे चित्रपटाचा अनुभव उलगडणार आहेत.  रविवार, १९ जानेवारी रोजी ‘मुक्काम पोष्ट रत्नागिरी’ हा कार्यक्रम होणार आहे. यात रवी सावंत, उदयदादा लाड, मंदार जोगळेकर, जयू भाटकर आणि देशात-परदेशात आपले कर्तृत्व गाजविणारे रत्नागिरीकर सहभागी होणार आहेत. त्यानंतर ‘कोकण किनारा’ हा कार्यक्रम होणार आहे.  मराठी अकादमी आणि वसुंधरा यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी परिसरातील विद्यार्थ्यांकरिता कर्करोग या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेतील डॉ. अनिल नेरुरकर या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे व सरचिटणीस राजीव मंत्री यांनी दिली आहे.