मोटारसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी एका तरुण बिल्डरवर गोळीबार केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बिल्डरला मदान रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कडबी चौकातील पेट्रोल पंपामागील गल्लीत बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांना समजले.
दीपक निहालचंद गुप्ता हे जखमी बिल्डरचे नाव आहे. आज सकाळी लघुवेतन कॉलनीतील घरून तो निघाला. घरासमोर उभ्या हुंडाई कारजवळ तो त्याच्या चुलत भावासोबत बोलत होता. तेवढय़ात तेथे काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवर दोघे आले. त्यांनी चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळला होता. भावासोबत बोलल्यानंतर दीपक कारमध्ये बसत असतानाच मोटारसायकलवर मागे बसलेला तरुण दाराजवळ आला. त्याने दीपकच्या भावाला बाजूला ढकलले आणि अगदी दाराजवळून गोळ्या झाडल्या. दीपक कारवर कोसळला आणि खाली पडला. हल्लेखोरांनी दीपकला चाचपडले. काहीच हालचाल करीत नसल्याचे पाहूनच हल्लेखोर वेगात पसार झाले.
गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील लोक हादरले. इमारतीमधील लोक बाहेर पडले नाहीत. दीपकच्या घरातील लोक धावत बाहेर आले आणि त्याला त्याच कारमधून मदान रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कळमना व जरीपटका तसेच गुन्हे शाखेचे पोलीस तेथे पोहोचले. अतिरिक्त पोलीस आयुक्त अनंत शिंदे, सहायक पोलीस आयुक्त संजय दराडे व मंगलजित सिरम सहायक पोलीस आयुक्त अनंत थोरात तेथे आले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पोलीस रुग्णालयात गेले. दीपकचे इतर नातेवाईक तसेत परिचितांची तेथे गर्दी झाली होती. दीपकच्या छाती व हाताला दोन गोळ्या चाटून गेली. एक गोळी उजव्या हाताच्या दंडात फसली तसेच एक गोळी कारच्या दुसऱ्या दारातून आरपार निघून गेली.
दीपकला आणखी तीन भाऊ आहेत. त्याच्या वडिलांचे अनेक वर्षांपूर्वी लहानसे हॉटेल होते. दीपकने भूखंड खरेदी -विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीतच तो एक मोठा बिल्डर झाला. कोराडी रोड व त्या परिसरात त्याने अनेक इमारती बांधल्या.
या परिसरात त्याने बऱ्याच जमिनी विकत घेतल्या आहेत. त्याच्यावर गोळीबार कुणी व कुठल्या कारणाने केला, याचीच चर्चा दिवसभर उत्तर नागपुरात सुरू होती. पोलिसांनी चार कुख्यात गुंडांची चाचपणी सुरू केली आहे. खसाळा परिसरातील मोठी जमीन दीपकजवळ असून त्यावर शहरातील पाच-सहा बडय़ांचा डोळा आहे. या जमिनीचा ताबा सोडावा, यासाठी दीपकवर दबाव टाकला जात असून वाटेल तेवढी रक्कम मोजण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. मोमीनपुऱ्यातील एका कुख्यात गुंडाने हा हल्ला केल्याची जोरदार चर्चा होती.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2013 रोजी प्रकाशित
जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
मोटारसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी एका तरुण बिल्डरवर गोळीबार केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बिल्डरला मदान रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कडबी चौकातील पेट्रोल पंपामागील गल्लीत बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
First published on: 23-05-2013 at 03:32 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoot out on builder due to land dispute