गणेश पेठेतील बुरुड आळी येथे शुक्रवारी सकाळी एका किराणा मालाच्या दुकानाला लागलेल्या आगीमध्ये हे दुकान व त्यातील माल भस्मसात झाला. आळीतील रहिवाशांनी तत्परता दाखवत दुकानाच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील सहाजणांना तातडीने बाहेर काढल्याने अनर्थ टळला. दोन वर्षांपूर्वी याच चाळीत लागलेल्या भीषण आगीत सहाजणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळे गुरुवारी सकाळी आग लागल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
बुरुड आळीमध्ये वैभव भंडारी याचे वर्धमान ट्रेडिंग हे किराणा मालाचे दुकान आहे. दुकानाच्या मागे गोडाऊन आहे. आज सकाळी या दुकानातून धूर येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. काही वेळातच दुकानातून आगीचे लोळ निघू लागले. या दुकानाच्या शेजारीच शखर वरतले व त्यांचे कुटुंबीय राहतात. आग लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर येथील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र, काही नागरिकांनी तत्परता दाखवत या घरातील व्यक्तींना तातडीने सुखरूप बाहेर काढले.
अग्निशामक दलाला या घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे तासभराच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या आगीची झळ काही प्रमाणात शेजारी असलेल्या एका दुकानाला बसली.