ख्रिस्ती जीवनास आवश्यक असणाऱ्या माहितीची दैनंदिनी प्रकाशित करण्याचा सतीश जाधव यांचा प्रयत्न कल्पकतेचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन नाशिक धर्मप्रांताचे सचिव विनायक पंडित यांनी केले. त्यांच्या हस्ते जाधव यांनी संपादित केलेल्या या दैनंदिनीचे प्रकाशन करण्यात आले. माजी नगरसेवक विनोद कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रेव्हरंड देवदत्त कसोटे, प्रसन्ना शिंदे, अतुल शिंदे, अनिल शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. संदीप जाधव यांनी सूत्रसंचालन केले. स्मिता जाधव, अशोक औताडे, सचिन साळवे, विकी लोंढे, स्मितीश जाधव यांनी संयोजन केले.
केडगावला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
केडगावच्या साम्राज्य युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन विक्रम पाचपुते यांच्या हस्ते चेंडू टोलवून झाले. मैदानी खेळांची परंपरा पुन्हा एकदा सुरू केली पाहिजे, असे मत पाचपुते यांनी व्यक्त केले. प्रतिष्ठानचे संस्थापक बापूसाहेब सातपुते, राष्ट्रवादीचे संभाजी सातपुते, नगरसेवक दिलीप सातपुते, किसन सातपुते, संजय लोंढे, गणेश नन्नावरे, पोपट कराळे, भरत गारूडकर, सचिन ठुबे, सुनिल गुंड, सागर सातपुते, बाळासाहेब बर्डे आदी यावेळी उपस्थित होते. १५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत १०० संघ सहभागी झाले आहेत.
कलकत्ता नेव्ही ट्रेनिंगसाठी १५जणांची निवड
कलकत्ता येथील मेट्री ट्रेनिंग सेंटरच्या वतीने नगरमध्ये चालवण्यात येणाऱ्या र्मचट नेव्ही करिअर अकादमीमधील १५ विद्यार्थ्यांची कलकत्त्यातील ट्रेनिंग सेंटरसाठी निवड झाली. र्मचट नेव्हीतील निवृत्त अभियंता गोरख ठुबे यांच्या हस्ते या १५ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ६० विद्यार्थ्यांची भरती झालेली असून संस्थेतील तंत्रशुद्ध शिक्षणामुळेच हे शक्य होत आहे, असे जाधव यांनी सांगितले. संस्थेच्या वतीने लवकरच करंजी घाट येथे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांशिवाय पर्याय नाही’
मानवनिर्मित ऊर्जा स्त्रोत मर्यादित असल्याने यापुढे अपारंपरिक व सौरऊर्जा स्त्रोतांचाच जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे होणार आहे, असे या क्षेत्रातील तज्ञ अमित काळे यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिक मंचच्या वतीने राधाबाई काळे कन्या महाविद्यालयात काळे यांच्या या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मंचाचे अध्यक्ष सर्वोत्तम क्षीरसागर, अशोक नवले, डॉ. अशोक काळे, श्रीमती केसकर, महेश चितांबर, उपप्राचार्य डॉ. बी. के. औटी, विज्ञान मंडळ सदस्य अ. के. कापरे, रविप्रकाश ठोंबरे आदी यावेळी उपस्थित होते.
उपमहापौरांच्या हस्ते सायकल रॅलीचे उद्घाटन
जय बजरंग विद्यालयाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या प्रबोधनात्मक सायकल रॅलीचे उद्घाटन उपमहापौर गीतांजली काळे यांनी या रॅलीत स्वत: सायकलवर सहभागी होऊन केले. जय बजरंग विद्यालय हे फुले पती-पत्नींना अभिप्रेत असणारे विद्यालय आहे. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या गोरगरिबांच्या मुला-मुलींसाठीच त्यांनी जीवनभर काम केले, असे श्रीमती काळे यांनी सांगितले. कार्यक्रमाला नगरसेविका संगीता खरमाळे, सुमन गंधे, नितीन शेलार आदी उपस्थित होते. संगीता पाठक यांनी प्रास्ताविक केले. पल्लवी देठे यांनी आभार मानले.
फुले जयंतीनिमित्त महिलांचा सत्कार
फिनिक्स सोशल फौंडेशनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्ती दिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात जिल्हा हमाल पंचायत व स्नेहालय या दोन संस्था व दुर्गाताई तांबे, सुनिताताई गडाख, मोनिकाताई कांबळे, प्रिया ओगले, डॉ. कमर सुरूर, लक्ष्मीबाई जाधव, कांताबाई फुलसौंदर, अंजली देवकर या महिलांचा गौरव करण्यात आला. सहकार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ह.भ.प. जंगलेमहाराज शास्त्री उपस्थित होते.
पिकविम्याला मुदतवाढ
वार्ताहर, राहाता
राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत रब्बी हंगामातील पिकविम्याची मुदत १५ जानेवारीपर्यत वाढविण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंतच होती.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर जास्तीतजास्त शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता यावे या हेतूने विमा योजनेची मुदत वाढविण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्रास सादर केला होता. गेल्यावर्षी रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी भरलेल्या २७ कोटी विमा हप्त्याच्या तुलनेत १३५ कोटींची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे योजनेचा जास्तीतजास्त शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने ही मुदतवाढ मिळण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रयत्न केले. म्हणून केंद्र शासनाकडून विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
श्रीरामपूरला आज महसूल अदालत
प्रतिनिधी, श्रीरामपूर
प्रांताधिकारी कार्यालयात उद्या (शनिवार) महसूल अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सुहास मापारी यांनी दिली.
प्रांताधिकाऱ्यांकडे असलेल्या अपिलांची सुनावणी करून ते निकाली काढण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. ८८ टक्के प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. आता श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, राहाता या तालुक्यातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा केला जाणार आहे. वारस नोंदी पीक पाहणी व शिवार रस्ते यासंबंधी सुनावणी घेऊन ही प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत, असे मापारी यांनी सांगितले.
कुस्ती स्पर्धास्थळास स्व. छबूराव लांडगे क्रीडानगरी नाव
प्रतिनिधी, नगर
नगरमध्ये पुढील आठवडय़ात होणाऱ्या ‘स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती’ स्पर्धेच्या स्थळास शहरातील नामवंत मल्ल ‘स्व. छबूराव लांडगे क्रीडानगरी’ असे नाव दिले जाणार आहे. पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्पर्धा आयोजन समितीच्या सभेत तसा ठराव करण्यात आला.
या स्पर्धेनंतर लगेच शहरात फेब्रुवारीमध्ये ‘उत्तर महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याची माहिती युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांनी स्पर्धास्थळी बोलताना सांगितले. स्पर्धेचा समारोप दि. १४ रोजी होत आहे, त्यादिवशी स्व. खाशाबा जाधव यांची जयंती आहे, त्यानिमित्ताने खेळाडू तसेच आयोजन समितीच्या सुमारे १५० सदस्यांना, स्व खाशाबा यांच्या चरित्र पुस्तकाचे वितरण केले जाणार आहे.
राज्य सरकारची ही मानाची स्पर्धा यशस्वी करण्याची जबाबदारी सर्व नगरकरांची आहे, स्पर्धेनंतर नगरच्या कुस्ती परंपरेस चालना मिळावी, यासाठी सातत्याने स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न राहील, असे पाचपुते यांनी सांगितले. सभेत सदस्य अंजली देवकर, अॅड. शिवाजीराव अनभुले, दीपक सूळ, संजय झिंजे, उबेद शेख, प्रा. मधुसूदन मुळे, वसंत लोढा आदींनी विविध सूचना केल्या.
जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, क्रीडा उपसंचालक आनंद व्यंकेश्वर, जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले आदी उपस्थित होते.