उन्हाळय़ातील पाण्याच्या काळजीपोटी महापालिकेने लातूर शहरातील सर्व प्रकारची बांधकामे स्थगित ठेवण्याचे आदेश प्रभारी आयुक्त डॉ. धनंजय जावळीकर यांनी दिले आहेत.
मांजरा धरणातून शहराला होणारा पाणीपुरवठा आता आठवडय़ातून एकदाच करण्यात आला आहे. पाण्याची काटकसर करण्यासाठी ७ जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांनी काळजी घेण्याचे आदेश महापालिकेस दिले होते. शहरात सुरू असणाऱ्या सर्व प्रकारच्या बांधकामांना नोटीस पाठवून बांधकाम स्थगित ठेवण्याचे आदेश बांधकाम विभागामार्फत जावळीकर यांनी बजावले आहेत.
खासगी विंधन विहिरीवर, नळाच्या पाण्यावर अथवा टँकरने पाणी घेऊन कोणी बांधकाम करत असेल तर ते बांधकाम स्थगित ठेवावे, असे आदेशात म्हटले आहे. याशिवाय नव्याने कोणत्याही बांधकामास परवानगी न देण्याचेही आदेशात बजावले आहे. शहरातील मनपाच्या विंधन विहिरीचे १८ लाख ३ हजार २२२ रुपयांचे वीजबिल थकीत होते. त्यामुळे विजेची जोडणी तोडण्यात आली. पालिकेने ही थकबाकी भरली असून बुधवारी सर्व विंधन विहिरींची जोडणी पुन्हा देण्यात आली.