कोटय़वधी रुपये अनुदानापोटी मिळत असूनही शहरातील विविध चौकांतील सिग्नल्स बंद असून त्या संबंधी कोणतीच हालचाल महापालिका प्रशासनाकडून होत नाही.२००० ते २०१२ या कालावधीत शहरातील वाहतूक विभागाने ४ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपये दंड वाहनधारकांकडून वसूल केला आहे. वसूल झालेल्या दंडापैकी ४० टक्के रक्कम वाहतुकीच्या सोयीसाठी शासन संबंधित नगरपालिकेला अथवा महापालिकेला देते म्हणजे आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख रुपयांचे अनुदान पालिकेला प्राप्त झाले आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून शहरातील विविध चौकातील सिग्नल्स मात्र कायमचे बंद आहेत. मिनी मार्केट व अशोक हॉटेल या दोनच चौकातील सिग्नल्स चालू आहेत.शहरात वाहनांची संख्या मोठी आहे. वाहतुकीचा ताणही प्रचंड आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी विविध चौकातील सिग्नल्स कार्यरत असणे आवश्यक आहे. यासंबंधी पोलीस विभागाने महापालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून मात्र कसलाच प्रतिसाद नाही. लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी या प्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.