कर्मचाऱ्यांच्या मागणीची पाल्यांना शिक्षा देणाऱ्या शहरातील सिल्व्हर ओक स्कूलच्या मुख्याध्यापकांनी सोमवारी महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चौकशी पथकाला धक्काबुक्की करीत दालनाबाहेर काढले. शालेय शिक्षण शुल्क मुदतीत न भरण्यावरून शाळा व्यवस्थापनाने ११ विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास मज्जाव केला. या संदर्भात चौकशी करण्यासाठी शिक्षण मंडळाचे पथक गेले असता व्यवस्थापनाने सहकार्य करण्याऐवजी चौकशी पथकाला हाकलून लावले. या घटनाक्रमाचा अहवाल मिळाल्यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने संबंधित शाळेवर कारवाई करण्याची तयारी दर्शविली आहे.
शिक्षण शुल्क न भरल्याच्या कारणावरून मागील आठवडय़ापासून शरणपूर रस्त्यावरील सिल्व्हर ओक स्कूल आणि आनंदवल्ली येथील सिव्हर ओक युनिव्हर्सल स्कूलमधील ११ विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या संदर्भात पालकांनी दाद मागितल्यानंतर पालिकेच्या शिक्षण मंडळाने संबंधित स्कूल व्यवस्थापनास नोटीस बजावली होती. वेतनवाढीसाठी काही कर्मचाऱ्यांनी मागणी केल्यामुळे नव्या शालेय व्यवस्थापनाने अकरा महिन्यांच्या करारपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न चालविल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या मुलांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. आता अचानक शुल्क आकारून ते न दिल्यामुळे पाल्यांना वर्गात बसण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, शिक्षण मंडळाचे अधिकारी सोमवारी चौकशीसाठी शरणपूर रस्त्यावरील सिल्व्हर ओक स्कूलमध्ये गेले होते. प्रारंभी शिक्षण मंडळाच्या एका अधिकाऱ्याला प्रवेशद्वारावर रोखण्यात आले. या घटनेची माहिती समजल्यानंतर मंडळाच्या प्रशासनाधिकारी डॉ. वसुधा कुरनावळ स्कूलमध्ये दाखल झाल्या. शाळेतील मुख्याध्यापकांविषयी स्वागतकक्षात विचारणा केली असता प्रशासनाधिकारी व पथकाला बाहेर बसण्यास सांगण्यात आले. नंतर मुख्याध्यापक उपस्थित नाहीत अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली; परंतु मुख्याध्यापिका अर्पणा सारथी या आपल्या दालनात असल्याचे समजल्यावर पथक तिथे गेले. शिक्षा दिल्या गेलेल्या विद्यार्थ्यांबाबतची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता मुख्याध्यापकांनी कोणतेही सहकार्य केले नाही. उलट, धक्काबुक्की करीत त्यांनी सर्वाना दालनाबाहेर हाकलून दिले. या घटनाक्रमामुळे डॉ. कुरळावण यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना धक्का बसला.
शाळा व्यवस्थापनाने चौकशीदरम्यान सहकार्य न करता उलट शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याची तक्रार शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनाक्रमाचा अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधित शाळेवर कारवाई केली जाईल, असे उपरोक्त कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचे प्रशासनाधिकारी डॉ. कुरणावळ  यांनी सांगितले.
‘ते’ विद्यार्थी घरी
सिल्व्हर ओक स्कूलमध्ये शिक्षण मंडळाच्या पथकाला हाकलून दिल्यामुळे या ठिकाणी शुल्क न भरल्याच्या कारणावरून वर्गाबाहेर काढण्यात आलेले विद्यार्थी सुरक्षित नसून हा तिढा सुटेपर्यंत संबंधित विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊ नये, अशी सूचना प्रशासनाधिकारी डॉ. वसुधा कुरणावळ यांनी केली आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून शाळा व्यवस्थापनाने या विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास मज्जाव केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पथकाशी व्यवस्थापनाने गैरवर्तन केले. या घटनाक्रमामुळे विद्यार्थ्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना घरी थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मनसेचा इशारा
संस्था व कर्मचाऱ्यांनी आपसातील वाद आपसातच मिटवावेत, त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना देऊ नये अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मनविसेने दिला आहे. सिल्व्हर ओक स्कूल व्यवस्थापनाने शिक्षण शुल्क न भरल्याच्या कारणावरून काही विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास प्रतिबंध केला आहे. संस्था व कर्मचाऱ्यांच्या वादामुळे ही घटना घडली असून त्याचा विद्यार्थ्यांशी कोणताही संबंध नाही. असे असताना त्यांना वर्गाबाहेर काढणे गैर असून व्यवस्थापनाने ही कारवाई मागे न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष खंडेराव मेढे यांनी दिला आहे.