उत्तर प्रदेशातील बहुसंख्य नीतीमत्ता व नैतिकता न पाळणाऱ्या दिगंबर अवस्थेतील साधुंच्या कार्यशैलीवर बोट ठेवून त्यांचा सहभाग असणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यास सक्त विरोध करण्याचे वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी केल्यानंतर स्थानिक पातळीवर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. गंगा-गोदावरी पुरोहित संघासह इतर काही साधु-महंतांनी या विषयावर मौन बाळगून सावध भूमिका घेतली तर अखिल भारतीय राष्ट्रीय आखाडा परिषद, पंचमुखी हनुमान मंदिर दिगंबर, चतु:संप्रदाय आखाडय़ांसह अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेने पाच हजार वर्षांची परंपरा लाभलेला सिंहस्थ कुंभमेळा होणारच असा निर्धार केला आहे. या स्वरुपाची विधाने करणाऱ्यांवर शासन योग्य ती कारवाई करेल असे काहींचे म्हणणे असून सिंहस्थासाठी मिळणारा निधी शहराच्या विकासासाठी खर्च होत असल्याकडे अनेकांनी लक्ष वेधले आहे.
शिव-शाहू यात्रेनिमित्त नाशिक येथे आलेल्या संभाजी राजे यांनी सिंहस्थाला विरोध करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. सिंहस्थ आणि वाद यांची पूर्वापार परंपरा आहे. कधी प्रशासन आणि साधू-महंत तर कधी विविध आखाडय़ांच्या साधूंमध्ये अंतर्गत वाद-विवाद झाल्याची उदाहरणे आहेत. २०१५ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा त्यास अपवाद ठरणार नाही असे दिसत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य व केंद्र शासन मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करते.  हा निधी देणे अयोग्य असल्याचे सांगत संभाजी महाराजांनी शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न, गड-किल्ल्यांचे संवर्धन यासाठी तो खर्च करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी परप्रांतीय साधुंच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे समस्त साधु-महंतांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. मात्र, गंगा-गोदावरी पुरोहित संघ आणि तत्सम काही महंतांनी या विषयावर मौन बाळगून फारसे न बोलण्याचा पवित्रा स्वीकारला. त्या विधानाची दखलच घेतली जाऊ नये असे मौन बाळगणाऱ्यांचे म्हणणे आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याचा विकास होतो. सिंहस्थात केवळ परप्रांतातून नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. त्यामुळे कोणाच्या विधानामुळे कुंभमेळा थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया उपरोक्त वर्तुळात उमटत आहे.
शासन त्यांची व्यवस्था करेल
प्रदीर्घ परंपरा लाभलेला सिंहस्थ कोणी थांबवू शकत नाही. असे विधान करणाऱ्यांची शासन व्यवस्था करेल. गोदावरी काठी वसलेले नाशिक ही संतांची भूमी आहे. साधुंचा सर्वसामान्यांना त्रास होत नाही. सिंहस्थामुळे मोठय़ा प्रमाणात विकास कामे होणार आहेत, हे विसरता कामा नये.
– भक्तीचरणदास महाराज, प्रवक्ते, अखिल भारतीय राष्ट्रीय आखाडा परिषद
सिंहस्थ कोणी थांबवू शकत नाही
हिंदु धर्माचे सर्वात मोठे पालक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिले जाते. त्यांचे वंशज असलेले संभाजी राजे यांनी हिंदु धर्मियांची सर्वात मोठी परंपरा असलेल्या धार्मिक उत्सवास विरोध करणे योग्य नाही. सवंग प्रसिद्धीसाठी असे विधान करणे अनुचित आहे. सिंहस्थ कुंभमेळा कोणालाही थांबविणे शक्य नाही. खरेतर कुंभमेळा हे नाशिकचे वैभव आहे. या निमित्ताने स्थानिक पातळीवर विकासकामांसाठी निधी मिळतो. त्यातून बरीच विकासकामे होतात.
महंत सुधीरदास महाराज, साधू-महंतात प्रांतिक
 भेद अयोग्य
सिंहस्थाला विरोध हे पूर्णपणे राजकीय वक्तव्य आहे. नाशिकचा कुंभमेळा हा हिंदु समाजाचा धार्मिक उत्सव आहे. छत्रपती  शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यांचे वंशज आज हिंदु धर्मातील उत्सवाला विरोध करतात हे दुदैवी आहे. शासन सिंहस्थात साधुंसाठी केवळ तंबु उभारणी व वीज जोडणी ही सुविधा तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करते. त्यासाठी फारसा खर्चही येत नाही. हा निधी परप्रांतीय साधुंवर खर्च होतो असे म्हणण्यास अर्थ नाही. मुळात, साधुंना कोणताही प्रांत नसतो. त्यांच्यात प्रांतिक भेदभाव करणे योग्य नाही.
– महंत कृष्णचरण दास महाराज, प्रमुख, चतुसंप्रदाय आखाडा
निधी देण्याचा अधिकार शासनाचा
सिंहस्थ कुंभमेळ्याची पाच हजार वर्षांची परंपरा आहे. यासाठी शासन जो निधी खर्च करते, तो केवळ साधुंवर होत नाही. बहुतांश निधी विकास कामांसाठी खर्च केला जातो. सिंहस्थासाठी निधी द्यायचा की नाही हे ठरविण्याचा अधिकार शासनाचा आहे.
दीपक बैरागी, अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषद