महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर निफाड तालुक्यातील चांदोरी येथे आयोजित ‘बहेना, तुमसे हैं कुछ कहेना’ या कार्यशाळेत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. निफाड पोलीस ठाणे, चांदोरीचे क. का. वाघ महाविद्यालय, सायखेडा महाविद्यालय, निफाडचे के.जी.डी.एम. महाविद्यालय आणि भाऊसाहेबनगर येथील क. का. वाघ महाविद्यालय यांच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांना कायद्याच्या आधारे अनेक सवलती मिळताना दिसत असल्या तरी राष्ट्र उभारणीत महिलांचे असलेले योगदान अतिशय महत्वपूर्ण असल्याचे मत मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिक, समाजसेवक व उद्योगपती युगराज जैन यांनी व्यक्त केले. आयुष्यात कोणताही निर्णय घेताना आई-वडिलांनी आपल्यासाटी केलेल्या सुखाचा व आनंदाचा त्याग लक्षात घ्या. आयुष्यातील खरे मार्गदर्शक आणि पहिले गुरू आपले आई-वडीलच असून त्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारे पुत्र कोटय़वधींची संपत्ती जमा करूनही भिकारीच ठरतात असे सांगून अनेक उदाहरणांचा दाखला देत जैन यांनी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणले.  अध्यक्षस्थानी क. का. वाघ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष काशिनाथ टर्ले होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक बी. टी. बारावकर, सरपंच विजय बागस्कर उपस्थित होते. परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे २८०० विद्यार्थिनी आणि १८० शिक्षकांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष वाघ यांनी प्रास्तविकात  कार्यशाळेचा हेतु स्पष्ट केला. व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सदस्य जगन कुटे, क. का. वाघ शिक्षण संस्थेचे विश्वस्त विलास टर्ले, बाळासाहेब गडाख, माणिकराव गायखे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सारिका सोनवणे, प्रा. सोनाली देवरे यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. एम. एम. घुमरे यांनी मानले.