महिला महोत्सव, आदर्श मातांचा सत्कार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव, महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन, अशा विविध स्वरूपाच्या उपक्रमांच्या माध्यमातून गुरूवारी जागतिक महिला दिन साजरा करण्याचा श्रीगणेशा झाला असून शुक्रवारी या निमित्त भरगच्च अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील आशीर्वाद फाऊंडेशनच्यावतीने गुरूवारी कालिदास कलामंदिरात महिला महोत्सव उत्साहात पार पडला. याप्रसंगी लोकसंघर्ष समितीच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षस्थानी संस्थेच्या शकुंतला जगताप होत्या. प्रास्ताविक संस्थेच्या सदस्या डॉ. मनिषा जगताप यांनी केले. यावेळी शिंदे यांनी पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात स्त्रियांवरील अत्याचारात वाढ होत असल्याकडे लक्ष वेधले. दरम्यान, महोत्सवात ‘स्त्री कथा आणि व्यथा’ या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात अमृता विष्णू, शिवानी आहेर, प्रियंका कासार तर महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या  ‘माझ्या मनातील स्त्री स्वातंत्र्य’ विषयावरील निबंध स्पर्धेत मनिषा पवार, वैशाली क्षीरसागर, शुभांगी भगवान तसेच ‘माझ्या बाळाची भावमुद्रा’ स्पर्धेत अन्वय गोखले, आरूष वाघचौरे आणि निधी बोरसे विजेते ठरले. यावेळी संघर्षमय परिस्थितीचा सामना करून आपल्या मुलांना वाढविणाऱ्या महिलांना मातोश्री केशरबाई जगताप आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार्थीमध्ये कस्तुराबाई साळवे, संगीता पाटील, नम्रता द्विवेदी आणि कौशल्या निरभवणे यांचा समावेश आहे.
उद्घाटन सत्रानंतर ‘माझे अनुभव, माझे विश्व’ या विषयावर परिसंवाद झाला. महिलांचे आरोग्य या विषयावर डॉ. मनिषा जगताप यांनी ‘स्लाईड शो’द्वारे माहिती दिली तर महिला आणि कायदा या विषयावर दिपाली मानकर यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र सांस्कृतीक ज्ञानपीठच्यावतीने जिल्हास्तरीय विविध सांस्कृतिक स्पर्धेचे पारितोषिक आणि महिला गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाटय़गृहात झालेल्या कार्यक्रमात महिला गौरव पुरस्काराने आ. निर्मला गावीत, डॉ. शोभा बच्छाव, माजी उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे, शेफाली भुजबळ, शर्वरी लथ, डॉ.उषा खाबिया, उषा शेळके, शोभा छाजेड, प्रिती कुलकर्णी, शोभना बूब, ज्योती देशमुख, रोहिणी नायडू, अ‍ॅड. मिलन खोहर, शिल्पा शहा, वैजंयती भट, ज्योती सोनवणे, सुहासिनी बुरकुले, संगीता जाधव, विद्या पाटील, डॉ. कविता बोंडे आणि उर्मी झालावत यांना सन्मानित करण्यात आले.
महिला दिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यशोदा सामाजिक विकास संस्थेच्यावतीने आशादीप मंगल कार्यालयात दुपारी चार वाजता महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्यां प्रा. वासंती सोर या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रा. सोर यांचे व्याख्याने होणार आहे. तसेच अमृतधाम परिसरातील फक्त मुलींना जन्म देवून कुटूंब नियोजन करणाऱ्या दाम्प्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
आयटक व भारतीय महिला फेडरेशनच्यावतीने शुक्रवारी दुपारी २ वाजता विविध क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. टिळकवाडी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात महिलांवरील अन्याय अत्याचार, महिलांचे कायदे या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुमन बागूल, शोभा चव्हाण, चित्रा जगताप, ज्योती नटराजन, वर्षां किणीकर, आशा धीवर, आशा मोरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
गंगापूर रोड येथील समर्थ महिला मंडळ व लिलावती हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर यांच्यावतीने ८ ते २५ मार्च या कालावधीत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी नगरसेविका सीमा हिरे (९०११० ६७९९९), लिलावती हॉस्पिटल (०२५३-२३१३१३५) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच रत्नसिंधू मित्र मंडळ आणि लाईफ केअर हॉस्पिटलच्यावतीने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता मटाले मंगल कार्यालयात डॉ उमेश मराठे व डॉ. दिनेश देसले मार्गदर्शन करणार आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी संयोजक परशूराम कानकेकर (९६७३९९५३७२) यांच्याशी संपर्क साधावा.
लोकनिर्माण प्रकल्प व अश्वमेध सामाजिक संस्थेच्यावतीने शुक्रवारी दुपारी तीन वाजता गंजमाळ येथील रोटरी क्लब येथे महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन आ. उत्तम ढिकले यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आ. वसंत गीते राहणार आहेत. जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेतर्फे सकाळी ११ वाजता कालिदास कलामंदिरात राजमाता जिजाऊ आत्मसन्मान गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुरस्कार्थींमध्ये कावेरी कासार, सुनिता आहेर, प्रतिभा सानप, सुरेखा जगताप, सुनिता अहिरराव, ज्योती वाघ, दिपाली मुकणे, प्रज्ञा रणवीर, भैरवी कुंवर, शलाका वाकतकर, मंजु वालिया, हरीता कोईमपट्टी, प्रियंका शेट्टी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय जल वर्षांनिमित्त राज्यातील पाणी टंचाई लक्षात घेता बचत गटांच्या सहकार्याने ‘थेंब थेंब वाचवु या’ विशेष उपक्रमाची सुरूवात करण्यात येणार आहे.