कोल्हारच्या पतसंस्थेवरील दरोडा
चार संशयितांना अटक व कोठडी
तालुक्यातील कोल्हार येथील भगवतीमाता पतसंस्थेवर दिवसाढवळ्या कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून सुमारे पाऊण कोटी रुपयांचा ऐवज लुटल्याप्रकणी चार संशयित आरोपींना पाचव्या दिवशी पोलिसांनी अटक केली. या चौघांना राहाता न्यायालयाने दि.२८पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी शिर्डी येथे पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. श्रीरामपूर विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुनिता साळुंके-ठाकरे यावेळी उपस्थित होत्या. पतसंस्था लुटीच्या घटनेतील आरोपींचे कर्मचाऱ्यांनी केलेल्या वर्णनावरुन व माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा सुरुवातीपासूनच कोल्हार येथील या पतसंस्थेचा गोल्ड व्हॅल्युअर रमेश कुलथे भोवती केंद्रीत केलेली होती. गुन्ह्यात वापरलेल्या गाडीच्या वर्णनावरुन, तसेच गुन्हा घडण्यापूर्वी गोल्ड व्हॅल्युअरचा मुलगा अजय कुलथे व त्याचा मित्र सागर मलिक याने पतसंस्थेला दिलेल्या भेटीची माहिती व मलिक याने पतसंस्थेत चाळीस ग्रॅम सोने तारण ठेवून तीस हजार रुपयांचे कर्ज घेतेवेळेस पतसंस्थेच्या कागदपत्रांवर केलेल्या स्वाक्षऱ्यांवरुन पोलीस यंत्रणेचा तपास गोल्ड व्हॅल्युअरचा मुलगा अजय रमेश कुलथे (वय ३३) व त्याचा मित्र सागर सोमनाथ देशमाने (वय २३, दोघेही रा. कोल्हार) यांच्या भोवतीच केंद्रित होते. त्या अनुषंगाने देशात रेखाचित्रासाठी प्रसिध्द असलेल्या एका अधिकाऱ्याकडून या संशयितांची रेखाचित्रे तयार केल्यानंतर पोलिसांना तपासाची दिशा मिळाली. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी औरंगाबाद, जळगाव व सांगली येथील गुन्ह्यांची माहिती, तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली व साक्षीदारांनी सांगितलेल्या शेवरोलेट, अॅप्ट्रा पिस्ता रंगाच्या १० ते १५ गाडय़ांचा विविध टोलनाक्यांवरुन माहितीच्या आधारे तपास केला. वरील सर्व बाबी व आरोपींची रेखाचित्रे या आधारे पोलिसांनी सोमवारी (दि.२१) रात्री अजय कुलथे व त्याचा मित्र सागर देशमाने यांना कोल्हार येथून, तर सागर रिवद्र मलिक (वय २०) व सोनू अशोक बेग (वय २४, दोघेही रा. श्रीरामपूर) यांना श्रीरामपूर येथून अत्यंत सावधरितीने अटक केली. या चार आरोपींखेरीज अजूनही दोन आरोपींचा या गुन्ह्यात समावेश असण्याची शक्यता असून लवकरच पोलीस त्यांना अटक करतील, असे िशदे यांनी सांगितले. तसेच या आरोपींकडून चोरीस गेलेले सोने व रोख रक्कम अद्याप हस्तगत झालेली नसली तरी ती लवकरच हस्तगत करण्याच्या दिशेने तपास सुरु आहे. आरोपी सागर कुलथे हा चोरीचे सोने खरेदी करतो अशी माहिती मिळाल्यावरुन या आरोपींचा या गुन्ह्याशी थेट संबंध असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने या चार आरोपींना या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याचे पोलीस अधिक्षक शिंदे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2013 रोजी प्रकाशित
गोल्ड व्हॅल्युअरच्या मुलाचा आरोपीत समावेश
कोल्हारच्या पतसंस्थेवरील दरोडा चार संशयितांना अटक व कोठडी तालुक्यातील कोल्हार येथील भगवतीमाता पतसंस्थेवर दिवसाढवळ्या कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून सुमारे पाऊण कोटी रुपयांचा ऐवज लुटल्याप्रकणी चार संशयित आरोपींना पाचव्या दिवशी पोलिसांनी अटक केली. या चौघांना राहाता न्यायालयाने दि.२८पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
First published on: 24-01-2013 at 04:15 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son of gold valuer involved in robbery