राज्यात सिंचन घोटाळ्यानंतर लवकरच वीज घोटाळा उघडकीस येणार असून यात विजेसाठी कोळसा निर्यातीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे हात काळे झाले आहेत, असा आरोप करीत या प्रश्नावर तीव्र लढा उभा केला जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा राजा म्हणवून घेणारे शरद पवार हे शेतकऱ्यांचे नव्हे, तर जवळच्या मूठभर मंडळींचे हित जोपासतात, असाही आरोप त्यांनी केला.
ऊस दर प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हाती घेतलेले आंदोलन महिनाभर स्थगित केल्यानंतर नवीन वर्षांत ते पुन्हा हाती घेतले. या आंदोलनाचे रणशिंग त्यांनी सोलापुरात गुरूवारी मोर्चाद्वारे फुंकले. चार हुतात्मा पुतळ्यांपासून हातात उसाचे दांडके घेऊन निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर त्याचे रुपांतर जाहीर सभेत झाले. या मोर्चाचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले.
तत्पूर्वी, एका पत्रकार परिषदेत बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी घोटाळ्यात व शेतकऱ्यांची लुबाडणूक करण्यामध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आहे. म्हणजे काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी क्रमांक एकचा शत्रू असल्याचे नमूद केले. म्हणूनच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात ऊसदर प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी होऊन उठाव केला आहे. ग्रामीण भागाचे अर्थकारण अवलंबून असलेल्या सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीने प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला असून सहकारी शिखर संस्था मोडीत काढून व साखर कारखान्यांची विक्री करून राष्ट्रवादीची मंडळी थांबत नाहीत, तर सिंचन घोटाळ्यापासून आता वीज घोटाळ्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. वीज घोटाळ्यावर बोलताना ते म्हणाले, राज्यात कोळसा उपलब्ध असताना राष्ट्रवादीच्या हितसंबंधातून इंडोनेशियातून चढय़ा दराने कोळसा आयात केला गेला. त्याचा वाढीव इंधनभार सामान्यजन व शेतकऱ्यांवर लादला. सामान्य जनतेच्या नजरेतून शेतकऱ्यांच्या डोक्यावर वीजदराचे खापर फोडायचा व शेतकऱ्यांना ‘खलनायक’ बनविण्याचा प्रयत्न होत आहे. लवकरच हा वीज घोटाळा उघडकीस येणार असून त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा प्रखर स्वरूपात राहणार असल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले.
आगामी लोकसभा निवडणुकीत आपली संघटना नऊ जागा लढविणार असून यात हातकणंगले, माढा, सोलापूर, उस्मानाबाद, बारामती, सांगली, नांदेड, बुलढाणा या जागांचा समावेश असेल. या निवडणुकीसाठी समविचारी पक्षांबरोबर समझोता करण्यासाठी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी, तिसरी आघाडी व आम आदमी पार्टी असे तीन पर्याय खुले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बहुसंख्य संचालकांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून आपापले साखर कारखाने, खासगी शिक्षण संस्था व उद्योग प्रकल्पासाठी भरमसाठ कर्ज घेतले व त्याची परतफेड न केल्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळणे अशक्य झाले आहे. याबाबत बँकेचे संचालक मंडळ तातडीने बरखास्त करून संचालकांवर फौजदारी कारवाई करावी, त्यांच्या मालमत्तांवर जप्ती आणावी, अशी आग्रही मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2014 रोजी प्रकाशित
राज्यात राष्ट्रवादीचा वीज घोटाळा लवकरच उघड होणार- राजू शेट्टी
राज्यात सिंचन घोटाळ्यानंतर लवकरच वीज घोटाळा उघडकीस येणार असून यात विजेसाठी कोळसा निर्यातीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे हात काळे झाले आहेत, असा आरोप करीत या प्रश्नावर तीव्र लढा उभा केला जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.
First published on: 03-01-2014 at 03:06 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soon ncps electricity scam to be exposed raju shetty