सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्रात सातत्याने घट होत चालल्याने त्याचा थेट परिणाम सोयाबीन प्रक्रिया उद्योगांवर झाला असून गेल्या दोन वर्षांत देशातील ८५ पैकी ३५ उद्योग बंद पडल्याचे धक्कादायक चित्र आहे. दुसरीकडे, सोयाबीन ढेपेच्या निर्यातीत देखील घट झाल्याने प्रक्रिया उद्योग संकटात सापडले आहेत.
देशात उत्पादित होणाऱ्या सोयाबीनपैकी सुमारे ६१ टक्के सोयाबीन हे मध्यप्रदेशात तर २७ टक्के उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. महाराष्ट्रात गेल्या दशकभरात सोयाबीनच्या लागवडीत सातत्याने वाढ होत गेली. विशेषत: कपाशीच्या लागवडीत अग्रेसर असलेल्या विदर्भात सोयाबीनचा पेरा झपाटय़ाने वाढला होता. पण, गेल्या काही वर्षांत सोयाबीनचे लागवडीखालील क्षेत्र झपाटय़ाने घटत चालले आहे. कमी उत्पादकता आणि बाजारभावतील चढउतार यामुळे शेतकऱ्यांनी अन्य पिकांचा पर्याय निवडल्याने सोयाबीनचे क्षेत्र कमी होत असल्याचे दिसले. त्याचा विपरित परिणाम सोयाबीन प्रक्रिया क्षेत्रावर झाला आहे. देशात सोयाबीन प्रक्रिया उद्योगांची संख्या ८५ च्यावर पोहचली आहे. त्यांची गाळप क्षमता सुमारे १ कोटी ५० लाख टन आहे. यातील ३५ उद्योगांना कच्च्या मालाअभावी टाळे लावण्याची पाळी आली आहे. उर्वरित कारखान्यांची स्थिती देखील चांगली नाही. क्षमतेपेक्षा कमी गाळप करण्याची वेळ या उद्योगांवर आली आहे. सुमारे ७० लाख टन सोयाबीनचे गाळप या उद्योगांमधून केले जात आहे.
सोयाबीनपासून खाद्यतेल आणि ढेप (पेंड) ही प्रमुख उत्पादने मिळतात. देशाच्या ९० टक्के सोयाबीनची गरज मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये भागवतात. अलीकडच्या काळात कर्नाटक आणि छत्तीसगडमध्येही सोयाबीनची शेती केली जात आहे. महाराष्ट्रात २०११-१२ या खरीप हंगामात सुमारे २७ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात आली, ४३ लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले. उत्पादकता मात्र प्रतिहेक्टरी १ हजार ५८१ किलोग्रॅम एवढीच होती. मध्यप्रदेशात सोयाबीनची उत्पादकता काही प्रमाणात वाढली असली, तरी महाराष्ट्रात अजूनही अपेक्षित यश गाठता आलेले नाही. उत्पादकता कमी असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीनची शेती परवडत नाही. त्यातच रोगांचा प्रादुर्भाव आणि नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना तोटाच सहन करावा लागत असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अलीकडच्या काही वर्षांत सोयाबीनऐवजी परंपरागत कपाशीलाच अधिक पसंती दिली आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांसाठी कपाशीसोबतच सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. सोयाबीन तेलाला देशांतर्गत मागणी वाढत आहे. सोयाबीनपासून तयार होणाऱ्या उपपदार्थाचीही मोठी बाजारपेठ आहे. देशातून सोयाबीन ढेप देखील मोठय़ा प्रमाणात विदेशात निर्यात होते. मात्र एप्रिल २०१२ ते डिसेंबर २०१२ या कालावधीत सोयाबीन ढेपेच्या निर्यातीत २६ टक्के घट झाल्याची माहिती सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (सोपा) प्रवक्ते राजेश अग्रवाल यांनी दिली आहे. या कालावधीत १९ लाख १५ हजार टन ढेप व्हिएतनाम, इराण, जापान, फ्रान्स, थायलंड, इन्डोनेशिया, कोरिया इत्यादी देशांना निर्यात करण्यात आली. गेल्या वर्षी याच काळात ही निर्यात २६ लाख टनापर्यंत होती. देशातंगर्त मागणी वाढल्याने निर्यातीत घट झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी सोयाबीन प्रक्रिया उद्योगांना कच्च्या मालाची चिंता भेडसावू लागली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींवर कच्च्या मालाचे दर ठरत असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ढेपेच्या भावातील तेजीमंदी स्थानिक बाजारपेठेतील सोयाबीन दरांवर परिणाम करणारी ठरते. आता सोयाबीनच्या भावातील घसरण आणि कमी उत्पादकतेचा प्रभाव प्रक्रिया उद्योगांच्या मुळाशी आला आहे.