महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीच्या अनुषंगाने आयुक्त विजय कुलकर्णी यांनी उद्या (बुधवार) मनपातील नोंदणीकृत पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. मनपाने केलेल्या मुल्यांकनाला शिवसेनेने विरोध केला असून या पाश्र्वभुमीवर बैठकीकडे या वर्तुळात लक्ष आहे.
मनपातील रखडलेल्या विविध निवडींसाठी येत्या शनिवारी (दि. १५) विशेष सभा बोलवण्यात आली आहे. या सभेत स्थायी समिती व माहिला-बालकल्याण समितीचे प्रत्येकी १६ सदस्य आणि स्वीकृत नगरसेवकांच्या पाच जागांच्या निवडी करण्यात येणार आहेत. यातील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी मनपाने पक्षनिहाय निश्चित कलेले मुल्यांकन व निवडीची पध्दत याविषयी माहिती देण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली असून उद्या सकाळी ११ वाजता आयुक्तांच्या दालनात ही बैठक होणार आहे. समद खान (राष्ट्रवादी), संजय शेंडगे (शिवसेना), दत्तात्रेय कावरे (भाजप) आणि गणेश भोसले (मनसे) या गटनेत्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.  
स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी मनपाने केलेल्या पक्षनिहाय सदस्यांच्या मुल्यांकनाला शिवसेनेने विरोध केला आहे. शिवसेना व अपक्ष आघाडीचे गटनेते संजय शेंडगे यांनी सोमवारी याबाबत मनपाचे नगरसचिव मिलींद वैद्य यांना पत्र देऊन हा विरोध नोंदवला. त्यामुळेच या निवडी वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रशासनाने केलेल्या मुल्यांकनानुसार स्वीकृत नगरसेवकपदासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि नवनिर्माण सेना या सर्व पक्षांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे. यातील मनसेच्याच जागेला शिवसेनेचा आक्षेप असून त्याऐवजी शिवसेनेचे दोन सदस्य स्वीकृत करावे अशी त्यांची मागणी आहे. राजकीय पक्षांनी केलेल्या गटनोंदणीनुसार राष्ट्रवादीच्या शहर विकास आघाडीचे २३ (पाच अपक्षांसह), काँग्रेसचे ११, शिवसेना व अपक्ष आघाडीचे १८ (एका अपक्षासह), भाजपचे ९ आणि मनसेचे ४ याप्रमाणे संख्याबळ आहे.
या संख्याबळानुसार मनपा प्रशासनाने शिवसेनेचे मुल्यांकन १.३२ केले असून मनसेचे ०.२९ आहे. त्यालाच शिवसेनेचा आक्षेप आहे. निकषानुसार १३.६ मुल्यांकनाला एका स्वीकृत सदस्याची निवड होऊ शकते. त्यानुसार शिवसेनेला दोन जागा मिळाव्यात अशी त्यांची मागणी आहे. या पाश्र्वभुमीवर शिवसेना उद्या या बैठकीत काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे.