आत्तापर्यंत केवळ चित्रपटाच्या मोठय़ा, भव्य पडद्यावर या इमारतीवरून त्या इमारतीवर सहजपणे उडय़ा मारत शत्रूची बखोटी धरणारा, त्याला नामोहरम करून जनसामान्यांना संकटातून वाचवणारा सुपरहिरो स्पायडरमॅन पहिल्यांदाच वास्तवातही एका सामाजिक मोहिमेचे नेतृत्व करणार आहे. दरवर्षी जगभरात एकाच दिवशी, एकाच वेळी होणाऱ्या ‘अर्थ अवर’ या उपक्रमाचे नेतृत्व पहिल्यांदाच स्पायडरमॅन करणार असल्याची अधिकृत घोषणा ‘अर्थ अवर’चे सहसंस्थापक अँडी रिडली यांनी केली आहे.
‘वर्ल्डवाईड फंड फॉर नेचर’ या संस्थेतर्फे दरवर्षी ‘अर्थ अवर’चे आयोजन केले जाते. जगभरात एकाच दिवशी एक तासभर गरज नसेल तिथले दिवे बंद करून मोठया प्रमाणावर वीज वाचवण्याचा प्रयत्न ‘अर्थ अवर’च्या माध्यमातून केला जातो. यावर्षी २९ मार्चला रात्री साडेआठ वाजल्यापासून एक तासभर ‘अर्थ अवर’ पाळला जाणार आहे. या मोहिमेचे नेतृत्व ‘द अमेझिंग स्पायडरमॅन’ चित्रपटातील सुपरहिरो स्पायडरमॅन करणार असून यानिमित्ताने स्पायडरमॅनची भूमिका करणारा अभिनेता अँड्रय़ू गार्फिल्ड, एम्मा स्टोन आणि दिग्दर्शक मार्क वेबर ही सगळी मंडळी या मोहिमेशी जोडली गेली आहेत.
‘अर्थ अवर’ची मोहीम २००७ साली सुरू झाली तेव्हापासून जगभरातील ७००० शहरांमधून आणि १५४ देशांमधून ती प्रभावीपणे राबवली जाते आहे. ‘अर्थ अवर’ हे प्रतिकात्मक असून आता ते केवळ तासभर वीज वाचवण्यापुरती मर्यादित राहिलेले नाही.
 या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणाशी संबंधित अनेक समस्यांच्या निराकरणासाठी उपाययोजना आखणे, त्यासाठी निधी गोळा करणे असे हे काम विस्तारत गेले असल्याची माहिती मार्क वेबर यांनी दिली असून ते ‘अर्थ अवर ब्ल्यू’ या नव्या उपक्रमाचेही नेतृत्व करत आहेत.
या उपक्रमांतर्गत इंडोनेशियातील जंगले, सुमात्रन वाघ, ओरांगउटान, हत्ती, गेंडे अशा प्राण्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. तर एक स्पायडरमॅन म्हणून या ‘अर्थ अवर’चे नेतृत्व करताना आपल्याला अभिमान वाटत असल्याचे अ‍ॅड्रय़ू गारफिल्ड याने म्हटले आहे. एकाचवेळी इतकी लोक एकत्र आल्यानंतर किती चांगली उर्जा निर्माण होऊ शकते, किती मोठे काम केले जाऊ शकते हे प्रत्यक्ष सिध्द करण्याची संधी या उपक्रमामुळे मिळत असल्याचेही अँड्रय़ूने म्हटले आहे. गेल्यावर्षी अभिनेत्री विद्या बालनने ‘अर्थ अवर’चे प्रतिनिधीत्व के ले होते.