लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर येथील कलागुरू मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी गटातटाचे राजकारण विसरण्याचा सल्ला दिला; परंतु माजी खासदार वसंत मोरे यांनी कार्यकर्त्यांवरच अविश्वास दाखवून गटबाजी कायम राहणार असल्याचे दाखवून दिले.
कार्यकर्त्यांनी गटातटाचे राजकारण विसरून एकदिलाने राष्ट्रवादीचे १५ उमेदवार महाराष्ट्रातून निवडून देण्याचे आवाहन केले. मात्र मेळाव्यातच गटातटाचे राजकारण सुरू असल्याचे जाणवले. मेळाव्याला उपस्थित माजी खासदार वसंत मोरे यांनी चक्क कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवून पक्षाने आपणास तीन वेळा दिलेली उमेदवारी ही पराभूत होण्यासाठीच दिली होती, अशी पक्षावरही तोफ डागली. आपण केलेल्या चांगल्या कामाचे फलित म्हणून पोटनिवडणुकीत १८ महिने खासदार म्हणून निवडून दिले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता तरी प्रामाणिकपणे पक्षाचे काम संघटितपणे करावे, असा सल्ला त्यांनी दिला. जळगाव लोकसभा मतदारसंघातून अद्याप कोणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी माजी राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असा सूर वक्त्यांच्या भाषणांचा होता. स्वत: पाटील यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याची ग्वाही दिली. सामंत यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. या वेळी आ. साहेबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, युवक काँग्रेसचे अध्यक्ष रमेश पाटील उपस्थित होते.
तालुक्यातील स्वाभिमानी राष्ट्रवादी गटाकडून मेळाव्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता. गेल्या तीन वर्षांपासून पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत असल्याचे कारण देत या गटाचे संजय पाटील, माजी पंचायत समिती सभापती भोजमल पाटील, सुभाष देसले, शिवाजी पाटील आदींनी  या   संदर्भात   सामंत   यांना   निवेदन  दिले.
जळगाव मतदारसंघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचेही नाव चर्चेत असले तरी सध्या ते घरकुल घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्याने पक्ष त्यांच्या उमेदवारीविषयी द्विधा मन:स्थितीत असल्याचे सांगितले जाते. जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आलेल्या असल्याने काँग्रेसकडून त्यांना कितपत साहाय्य होईल याबद्दल राष्ट्रवादीमध्येच साशंकता व्यक्त केली जात आहे.