मलकापूर मार्गावरील एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयात काल सकाळी १०.३० वाजता सर्व कर्मचारी कामात व्यस्त असतानाच एका कर्मचाऱ्याच्या चाणाक्ष डोळ्यांनी टेबलाखालून भलामोठा साप गेल्याचे टिपले आणि तेथे चांगलाच गोंधळ उडाला व भीती निर्माण झाली; मात्र शहरातील सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी मोठय़ा शिताफीने हा बारा फूट लांबीचा साप जेरबंद केल्यानंतर सर्वानी सुटकेचा नि:श्वास सोडला.  बुलढाणा-मलकापूर मार्गावरील विभागीय कार्यालयातील लेखा विभागात ही थरारक घटना घडली. लेखा विभागाचे लिपिक मोहन लठ्ठाड यांना टेबलाखालून काहीतरी वेगाने सरपटत गेल्याचे जाणवले. बारकाईने पाहिल्यावर तो साप असल्याचे दिसून येत नाही तोच तो अडचणीच्या जागी जाऊन लपला. यामुळे पाचावर धारण बसलेल्या लठ्ठाड यांनी याची माहिती देताच लेखा विभागात एकच खळबळ उडाली. पाहता पाहता ही खबर वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण विभाग नियंत्रक कार्यालय परिसरात पसरल्याने लेखा विभाग बघ्यांच्या गर्दीमुळे काही मिनिटांतच हाऊसफुल्ल झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना देण्यात आल्यावर ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. रसाळ यांना घटनास्थळीचा अदमास घेऊन अत्यंत सावधगिरीने दडून बसलेल्या या सापाला बाहेर काढून जेरबंद केले. यानंतर साऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, या धाडसी कारवाईबद्दल विभागीय लेखा अधिकारी संजय गायधनी, कर्मचारी, विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रसाळ यांचे अभिनंदन करून आभार मानले. यानंतर विभागाचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू झाले.