मनपाच्या स्थायी समितीत सभापती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शैलजा स्वामी, दिलीप कंदकुत्रे यांचा अखेर भ्रमनिरास झाला. काँग्रेसचे ६ सदस्य निवडताना नांदेड उत्तर मतदारसंघावर अन्यायाची परंपरा कायम ठेवत आमदार पोकर्णा यांच्या गटाला झुकते माप देण्यात आले.
स्थायी समितीचे ८ सदस्य गेल्या आठवडय़ात निवृत्त झाले. त्यात ६ काँग्रेस सदस्यांचा समावेश होता. विद्यमान सभापती गणपत धबाले यांच्यासह ६ जण निवृत्त झाल्याने स्थायीत शिरकाव करून सभापती होण्यासाठी अनेकांनी मोच्रेबांधणी केली. काँग्रेसतर्फे स्थायीचे माजी सभापती किशोर स्वामी यांच्या पत्नी शैलजा, माजी सभापती दिलीप कंदकुत्रे, राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले तुलजेश यादव यांच्यासह आणखी काही नगरसेवक गुडघ्याला बाशींग बांधून तयार होते. या सहांमध्ये आपला समावेश व्हावा, या साठी अनेकांनी आपापल्या परीने प्रयत्न केले. परंतु माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विनय गिरडे, किशोर यादव, हसिना बेगम चाऊस, शंकर गाडगे, उमेश पवळे, वाजेदा तबस्सुम यांना संधी दिली. या सहापकी चारजण दक्षिण मतदारसंघातून विजयी झाले आहेत. एमआयएमने संविधान पार्टीला दूर ठेवत अ. हबीब अ. रहीम व शेख हबीब शेख अब्दुल्ला यांना स्थायी समितीवर संधी दिली. स्थायी समितीत आता सभापतिपदासाठी विनय गिरडे व खासदार भास्करराव पाटील यांचे कट्टर समर्थक सरजितसिंग गील यांच्यात चुरस आहे. सिडको भागाला प्राधान्य देण्यासाठी गिरडे यांना संधी दिली जाऊ शकते, असे मानले जाते. स्थायी समितीत दक्षिण मतदारसंघातील सदस्यांचा जास्त प्रभाव असल्याने उमेश पवळे यांना सभापतिपदाची संधी देऊन नांदेड उत्तर मतदारसंघाला न्याय देऊ शकतो, असा एक मतप्रवाह आहे. शिवसेनेच्या शांताबाई मुंडे, अशोक उमरेकर हे स्थायीत ‘नशिबा’ ने असल्याने शिवसेनेतर्फे स्थायी समितीत जाऊ पाहणाऱ्या सुदर्शना खोमणे, ज्योती खेडकर यांना आणखी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे. संविधान पार्टीतर्फे बाळासाहेब देशमुख इच्छुक होते. पण त्यांना संधी मिळाली नाही.
मनपाच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत देगलूर नाका येथील मॅफ्को कत्तलखान्याचे काम बंद राहील, असे आदेश महापौर अब्दुल सत्तार यांनी दिले. सचिन तेंडुलकर याला भारतरत्न व फ. मुं. िशदे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर झाल्यानंतर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली.