मुंबईतील रस्त्यांवर सुरू असलेल्या अनेकविध कामांच्या मंदगतीलर सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला. मात्र या आक्षेपांना उत्तरे देण्यास संबंधित अधिकारीच बैठकीत उपस्थित नसल्याने नगरसेवक संतप्त झाले.
भुलाभाई देसाई मार्गावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यातच जलवाहिनी बदलण्यात येत आहे. तसेच पर्जन्य जलवाहिन्यांचीही कामे मार्गी लावण्यात येत आहेत. एकाच रस्त्यावर रस्ते, जल आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागांमार्फत कामे करण्यात येत आहेत. मात्र त्यावरील चर्चेच्या वेळी केवळ जलविभागाचे अधिकारी उपस्थित होते. अनुपस्थित बेजबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.
या बैठकीला केवळ प्रमुख जलअभियंते रमेश बांबळे उपस्थित होते. रस्ते विभागाचे मुख्य अभियंता आणि पर्जन्य जलवाहिनी विभागाचे मुख्य अभियंता अनुपस्थित होते. प्रशासनाचा अधिकाऱ्यांवर अंकुश नाही. यापुढे संबंधित अधिकारी अनुपस्थित राहिल्यास बैठक तहकूब करावी, अशी मागणीही नगरसेवकांनी केली. तर आदेश देऊनही अधिकारी उपस्थित राहात नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला दिले.
बैठकीस उपस्थित राहण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. मात्र ते उपस्थित नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमागे सबळ कारण नसल्यास त्यांना ताकीद देण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले.
जैन यांच्यावर कारवाई सुरू
पी-उत्तर विभाग कार्यालयात एका जाहिरातीच्या चित्रिकरणास परवानगी देणारे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्यावर नोटीस बजावण्यात आली होती. त्याचे उत्तरही त्यांनी दिले आहे. या उत्तराबाबत पुढील कारवाई सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी स्पष्ट केले. मात्र या उत्तरामुळे नगरसेवक संतापले. ही कारवाई पाच-सहा महिने सुरू राहील आणि हळूहळू हे प्रकरण विस्मृतीत जाईल. त्यामुळे जैन यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली.