बारावीच्या परीक्षेनंतर आता विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश चाचण्यांचे वेध लागले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदतही संपुष्टात आली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीचे शैक्षणिक क्षेत्र आधीच ठरवून त्यानुसार प्रवेश परीक्षा द्यायची तयारी केली आहे. वैद्यक, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, एमसीए, औषधनिर्माणशास्त्र आणि आर्किटेक्ट इत्यादी विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. बहुतेक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा मे महिन्यात आहेत.
चार वर्षांच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमाबरोबरच औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा येत्या १६ मे रोजी होऊ घातली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्य़ांच्या ठिकाणी या प्रवेश परीक्षेचे केंद्र असेल. एमएचटी-सीईटी ऐवजी यावर्षी महाराष्ट्र तंत्रशास्त्र सामाईक प्रवेश परीक्षा(एमटी-सीईटी) नावाने ही प्रवेश चाचणी तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत घेण्यात येईल. त्यानुसार १६ मेच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे अ‍ॅडमिट कार्ड आणि स्कोअर कार्ड ज्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज केला आहे, त्या ठिकाणाहून गोळा करायचे आहेत.
अभियांत्रिकी पाठोपाठ व्यवस्थापन क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असते. विद्यार्थ्यांसाठी सामाईक व्यवस्थापन प्रवेश चाचणी (सीमॅट) मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात १९ मे ते २२ मे दरम्यान तिसऱ्यांदा होऊ घातली आहे. यापूर्वीच्या दोन चाचण्यांचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना घेता आला नाही. त्यांच्यासाठी ही सीमॅट अतिरिक्त चाचणी म्हणून घेतली जाणार असल्याचे अखिल भारतीय तंत्र शिक्षण संस्थेने आधीच घोषित केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०१३-१४च्या प्रवेशासाठी यापूर्वीच विद्यार्थ्यांना दोनदा प्रवेश चाचण्या देण्याची संधी उपलब्ध करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांनी दोन संधी घेतल्यानंतर दोनपैकी ज्या चाचणीत जास्त गुण मिळतील ते गुण एमबीएच्या प्रवेशासाठी ग्राह्य़ धरले जातील. ज्या विद्यार्थ्यांनी एकच प्रवेश चाचणी दिली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी १९ ते २२ मे दरम्यान होणारी सीमॅट चांगला स्कोअर करण्यासाठी उपयोगी ठरेल. हमखास नोकरीची हमी देणारा एमसीए हा एक महत्त्वाचा व्यावसायिक अभ्यासक्रम असून याचे मर्यादित महाविद्यालये आणि जागा असतात.
मास्टर ऑफ कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनसाठी(एमसीए) पुढील महिन्यात सात एप्रिलला प्रवेश चाचणी होणार आहे. त्याचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत यापूर्वीच संपली आहे.
दोन दिवसांनी २५ मार्चनंतर या परीक्षेसाठीचे हॉल तिकिट विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. परीक्षेचा निकाल १५ एप्रिलला जाहीर करण्यात येईल. त्याचबरोबर आर्किटेक्ट अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा येत्या १९ मे रोजी होऊ घातली आहे.