स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद सार्ध शताब्दी समारोह समिती व सिम्प्लिफाइड टेक्नॉलॉजी फॉर लाइफ यांच्या वतीने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सूर्यकुंभ उपक्रमाचे आयोजन केले आहे. सोलर एनर्जी क्लासअंतर्गत उद्या (शनिवारी) जे.ई.एस. महाविद्यालय मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. समारोपास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्य़ाच्या १०७ शाळांमधील २ हजार १७१ विद्यार्थ्यांनी उपक्रमात पूर्वनोंदणी करून सहभाग निश्चित केला आहे. या शाळेतील किमान २० विद्यार्थी या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. उपस्थित विद्यार्थ्यांना सूर्यचूल (सोलर कुकर) प्रत्यक्ष तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन प्रत्येकाकडून एक सूर्यचूल तयार करून घेतली जाईल. यासाठी २०० प्रशिक्षकांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सूर्यचूल झाल्यानंतर त्यावर साबुदाणा खिचडी करुन ती उपस्थितांना खायला दिली जाणार आहे. सूर्यकुंभ उपक्रमात पूर्वनोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सकाळी ७ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीचे संचालक सुनील रायठठ्ठा, सुनील गोयल, विवेक काबरी यांनी केले.