शिवसेनेचे प्रथम महापौर व काँग्रेसचे नगरसेवक सुधाकर पांढरे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांकडून देण्यात आली. शिवसनिकांमध्ये या वृत्ताने चतन्याचे वातावरण पसरले आहे.
सेनेची स्थापना झाल्यानंतर निष्ठावंत शिवसनिकांमध्ये पांढरे यांचा समावेश होता. अभ्यासू व कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा नेता अशी ओळख असलेल्या पांढरे यांनी नारायण राणे यांच्यापाठोपाठ सेनेला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर त्यांनी स्वत:चे सामाजिक कार्य व अस्तित्व कायम ठेवले. दोन वेळा काँग्रेसकडून ते महापालिकेत विजयी झाले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत निवडून येताना कन्या स्नेहा पांढरे व अन्य काहींच्या विजयात मोठा हातभार लावला. काँग्रेसमध्ये राहूनही मित्रमंडळाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे संघटन कायम ठेवणाऱ्या पांढरे यांच्यावर काँग्रेसने नेहमीच अन्याय केला. स्थायी समितीच्या सभापतीचे ते दोन वर्षांपूर्वी प्रबळ दावेदार असताना त्यांना डावलण्यात आले.
पांढरे यांनी आता कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सेनेत प्रवेश घेण्याचे निश्चित केल्याचे सांगण्यात आले. येत्या आठवडाभरात पांढरे यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. स्वत: पांढरे यांनी याबाबत कोणते भाष्य टाळले असले तरी समर्थकांच्या दाव्यानुसार ते सेनेत प्रवेश करणार आहेत. शिवाय नांदेड उत्तर मतदारसंघात निवडणूक लढविणार आहेत. पांढरे यांच्यासमवेत काँग्रेसचे अन्य ३ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे कळते.
नांदेड उत्तर मतदारसंघात सेनेकडे प्रबळ उमेदवार नाही. उत्तर मतदारसंघात सेनेच्या शांताबाई मुंडे, बालाजी कल्याणकर, विनय गुर्रम, बाळासाहेब देशमुख, वैशाली देशमुख, जाधव, अशोक उमरेकर, नागाबाई कोकाटे, श्याम बन हे ९ नगरसेवक निवडून आले. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सेनेने महापालिका निवडणुकीत मोठी मुसंडी मारली. या बरोबरच ग्रामीण भागात राष्ट्रवादीची पकड मजबूत असल्याने त्याचा फायदा शिवसेनेला होत असतो. या पाश्र्वभूमीवर पांढरे यांचा सेनेत प्रवेश काँग्रेससाठी डोकेदुखी मानली जाते.