शहर परिसरात स्वाईन फ्लूचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य विभागाने लहान बालके, गर्भवती महिला वयोवृध्द तसेच रोगप्रतिकार क्षमता कमी असलेले यांचा लक्ष्य गट करत त्यांच्या प्रबोधनावर भर देण्याचे निश्चित केले आहे. जिल्ह्यात दीड महिन्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे २० रुग्ण आढळले. त्यातील सहा रुग्णांचा मृत्यू झाला. या पाश्र्वभूमीवर, उपचारात चालढकल होऊ नये यासाठी चार उपकेंद्रात स्वाईन फ्लुूकक्षांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात दोन अतिदक्षता विभाग सुरू आहेत. रुग्णांनी स्वाईन फ्लूसदृश्य लक्षणे आढळल्यास तातडीने रुग्णालयात संपर्क साधावा तसेच स्वच्छतेवर भर द्यावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. आरोग्य विभागाकडे टॅमी फ्लूचा मुबलक साठा असल्याचे सांगण्यात आले.
स्वाईन फ्लूचा प्रतिकार करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, महानगरपालिका व जिल्हा परिषद आरोग्य विभाग या त्रिस्तरीय यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाही होत आहे. या बाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत २० जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली. या काळात आरोग्य विभागाने सहा हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी केली. त्यात स्वाईन फ्लूग्रस्त रुग्णांचे नातेवाईक आणि त्यांच्या सभोवताली असणाऱ्या स्थानिक नागरीकांची समावेश आहे. स्वाईन फ्लू सदृश्य लक्षणे आढळल्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करत रुग्णाच्या थुंकीचे नमुने घेतले जातात. आवश्यक चाचण्या करून औषधोपचार सुरू आहेत. तसेच, गर्भवती महिलांसाठी आशा, अंगणवाडी सेविका, जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आवश्यक औषधांसह विश्रांतीविषयी सूचना प्रबोधनावर भर देण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी सांगितले. लहान मुलांसाठी अर्थात शून्य ते सहा वयोगटातील बालकांसाठी ‘हात धुवा’ हे स्वच्छता अभियान सुरू असून बालक तसेच त्यांचे पालक यांच्यात आजाराविषयी प्रबोधन व्हावे याकरीता कार्यशाळा, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे नियोजन आहे. या अंतर्गत तालुकास्तरावर गट शिक्षण अधिकारी, तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, सीडीपीओ यांचे प्रशिक्षण घेण्यात असून तालुक्यात सात ठिकाणी ही कार्यशाळा पार पडली.
महापालिका स्तरावर इंडियन मेडिकल असोसिएशन, निमाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून खासगी रुग्णालयांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन निफाड, चांदवड, मनमाड, कळवण आणि मालेगाव उपजिल्हा रुग्णालय येथे स्वतंत्र स्वाईन फ्लू कक्ष सुरू स्थापन करण्यात आला आहे. तसेच, गाव पातळीवर प्रत्येक प्राथमिक रुग्णालयात दोन खाटा स्वाईन फ्लु सदृश्य आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी ठेवण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, स्वतंत्र कक्षासाठी आवश्यक व्हेंटीलेटर, ऑक्सिजन सिलिंडरसह औषधसाठा देण्यात आला आहे. रुग्णाची शारिरीक परिस्थिती नाजूक असल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात ठाणे, नाशिक, येवला, सिन्नर येथील सहा स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील एकाची स्थिती गंभीर आहे. रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी सांगितले.
रुग्णांची संख्या वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरीकांनी आजाराविषयी सजगता निर्माण होत आहे. मात्र आकडेवारी पाहता नागरीकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन डॉ. वाकचौरे, डॉ. माले यांनी केले.
आरोग्य विभागाकडे आजाराचा प्रतिकार करण्यासाठी औषधसाठा मुबलक स्वरूपात आहे. पण, खासगी रुग्णालयांकडून तसेच किरकोळ आजारांवर ‘टॅमी फ्लू’ गोळ्यांची मागणी होत असल्याने आवश्यकतेनुसार औषधांचा वापर करावा अशी सूचना सर्वत्र देण्यात आल्याचे डॉ. माले यांनी सांगितले.