परळी मतदारसंघात अधिकृतरीत्या पक्षात नसलेल्यांचाच राष्ट्रवादीत वावर सुरू आहे. आपल्याला विचारात न घेता परस्पर निर्णय होत असल्याने खंत वाटते. पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर आजही निष्ठा आहे. मात्र नि:स्वार्थपणे १३ वर्षे पक्षाचे काम करूनही योग्य संधी मिळाली नसल्याने आपली घुसमट होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत योग्य विचार झाला नाही तर वेगळा विचार करावा लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस फुलचंद कराड यांनी नाराजी व्यक्त केली. अस्वस्थ कराड स्वगृही भाजपमध्ये प्रवेश करणार की आणखी नवा पर्याय निवडणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
फुलचंद कराड यांनी पक्षात आपली घुसमट होत असल्याची जाहीर कबुली दिल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. याबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना कराड म्हणाले, १३ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००४च्या निवडणुकीत परळी मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात तब्बल ५६ हजार मते मिळवली. मात्र पक्षाने क्षमतेनुसार योग्य संधी दिली नाही. तरीदेखील नि:स्वार्थपणे पक्ष वाढविण्याचे काम केले. अलीकडच्या काळात अधिकृतपणे पक्षात नसलेल्यांचा वावर राष्ट्रवादीत अधिक वाढला आहे. आपले मत विचारात न घेता मतदारसंघात कार्यक्रम घेतले जात असल्याची खंत कराड यांनी व्यक्त केली. आजही पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत योग्य न्याय मिळावा, अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, अशा शब्दात कराड यांनी आपली घुसमट व्यक्त केली.
भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी राज्यभर संघटन वाढवून राजकीय ताकद भारतीय जनता पार्टीच्या मागे उभी केली. बीड जिल्हा भाजपचे ११ वर्षे अध्यक्ष आणि वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, युतीच्या काळात राज्य परिवहन महामंडळाचे संचालक अशा अनेक पदावर त्यांनी काम केले. खासदार गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजप बंडखोर आ. धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादीत वावर वाढला. त्यामुळे कराड अस्वस्थ आहेत. नगरपालिका मुंडे यांच्या ताब्यात असल्याने शहरातील व तालुक्यातील कार्यक्रमातून कराड यांना डावलले जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांतून केला जात आहे. राजकीय भविष्याचे काय या चिंतेने कराड मागील काही दिवसांपासून राजकीयदृष्टय़ा अस्वस्थ आहेत. अखेर त्यांनी आपली घुसमट जाहीरपणे व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 17th May 2013 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादीत फुलचंद कराडांची घुसमट; नवीन राजकीय पर्यायाचा शोध सुरू
परळी मतदारसंघात अधिकृतरीत्या पक्षात नसलेल्यांचाच राष्ट्रवादीत वावर सुरू आहे. आपल्याला विचारात न घेता परस्पर निर्णय होत असल्याने खंत वाटते. पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर आजही निष्ठा आहे.
First published on: 17-05-2013 at 01:11 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suffocation of fulchand karad in ncp search for new political option