के.एम.टी.च्या एका चालकाने घरगुती कारणातून गळफास लावून आत्महत्या केल्याचे रविवारी उघडकीस आले. दगडू धादवड (वय ४०, मूळ रा. पुणे, सध्या कोल्हापूर) असे या व्यक्तीचे नाव आहे. धादवड हे लक्षतीर्थ वसाहतीमध्ये कुटुंबीयांसमवेत राहतात. काल रात्री त्यांनी मद्यप्राशन केले होते. पत्नीशी भांडण झाल्याने त्यांनी तिला मुलांसह घराबाहेर काढले होते. रात्री ते एकटेच घरामध्ये होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पत्नीने दरवाजा वाजवला, मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. पत्नीने खिडकीतून डोकावून पाहिले असता धादवड यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे.