आजच्या स्पर्धात्मक युगात वेळेचा उपयोग योग्यरीत्या आपल्या विकासासाठी करता यावा, या हेतूने प्रहार संस्थेतर्फे दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटय़ांचा सदुपयोग करण्याच्या दृष्टीने विविध साहसी शिबिरे आयोजित केली जातात. यंदाही ९ ते २५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी प्रहार शौर्य शिबिरे १३ ते १९ एप्रिल, २० ते २६ एप्रिल, २७ एप्रिल ते ३ मे व ४ ते १० मे या कालावधीत आयोजित करण्यात आली आहेत.  
या निवासी शिबिरांमध्ये मुलांना घरच्या सुरक्षित वातावरणातून निघून स्वत:चे दैनंदिन कार्य स्वत: करता यावे तसेच आपल्या समवयस्क मुलांसोबत एकत्र राहण्याची भावना व मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन चांगल्या गुणांचे सर्वासमक्ष प्रस्तुतीकरण करणे शिकवले जाते.
या शिबिरांत धावणे, व्यायाम, ऑब्स्टेकल्स ट्रेनिंग, फायरिंग, व्यक्तिमत्त्व विकास या विषयांची माहिती देण्यात येईल.
हे अभिनव शिबीर उमरेड रोडस्थित प्रहार प्रशिक्षण केंद्रात दिले जाईल. तसेच सतपुडा ट्रेकिंग कॅम्प ५ ते ११ मे या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
या आगळ्या जंगल ट्रेकिंग कॅम्पमध्ये मुलांना ट्रेकिंग, रॅपलिंग, माऊंटेनियरिंग, रॉक क्लाईंबिंग, पक्षी निरीक्षण इत्यादी प्रशिक्षणाची माहिती देण्यात येईल. मुलांना या दोन्ही शिबिरानंतर हिमालयाच्या स्नो लाईनपर्यंत हिमालय भ्रमणाच्या हिमालय ट्रेकिंग कॅम्पचे आयोजन धर्मशाळा येथे १५ ते २६ मे या काळात करण्यात आले आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. अधिक माहितीसाठी सी.पी. अ‍ॅन्ड बेरार क्लबजवळ रविनगर येथील प्रहार कार्यालयात किंवा  दूरध्वनी क्र. २५४०६१५ वर संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer adventure camps from 13 april
First published on: 20-03-2015 at 02:54 IST