अकोला महापालिकेतील सत्तारूढ महाआघाडीचा पाठिंबा काढण्याचा इशारा अकोला शहर विकास आघाडीच्या प्रमुखांनी दिला. यामुळे येथील सत्तारूढ महाआघाडी अल्पमतात येण्याची दाट शक्यता आहे. महाआघाडीला पाठिंबा देणाऱ्या या पाच नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामे ठप्प झाल्याने हा इशारा दिला.
महाआघाडीचा पाठिंबा काढल्यास सत्तारूढ भारिप-बमसं व काँग्रेसला येथे जोरदार झटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अकोला महापालिकेत काँग्रेस, भारिप-बमसं, राष्ट्रवादी, अकोला शहर विकास आघाडी यांच्या महाआघाडीची सत्ता आहे. या महाआघाडीला अकोला शहर विकास आघाडीच्या पाच नगरसेवकांचा बाहेरून पाठिंबा आहे. या पाठिंब्याच्या आधारावर भारिप-बमसंच्या ज्योत्स्ना गवई या महापौर, तर काँग्रेसचे रफिक सिद्दिकी उपमहापौर झाले आहेत. असे असताना अकोला शहर विकास आघाडीच्या पाच सदस्यांच्या प्रभागातील विकास कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे या पाच नगरसेवकांनी महाआघाडीचा पाठिंबा काढण्याचा इशारा दिला असून त्यामुळे महाआघाडी सरकार अल्पमतात येण्याची चिन्हे आहेत. असे झाल्यास महापालिकेत सत्तारूढ पक्षातर्फे आमसभेत येणाऱ्या ठराव पारित होण्यास मोठी अडचण उभी राहणार आहे.
नागरिकांच्या मुलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष झाल्याने, तसेच ठप्प झालेली विकास कामे व कर्मचाऱ्यांचे थकित वेतन यामुळे हा इशारा या शहर विकास आघाडीने दिला आहे.
या संबंधीचे एक पत्र शहर विकास आघाडीचे प्रमुख शेख बेनी शेख गंगा बेनीवाले यांनी आज महापौरांना दिल्याची माहिती मिळाली, तसेच या पत्राच्या प्रती त्यांनी महापालिका आयुक्त व अकोला महाआघाडीचे अध्यक्ष मदन भरगड यांना दिल्याचे समजते.
अकोला महापालिकेतील या घडामोडींमुळे शहरातील काँग्रेसच्या पाठिंब्यावर असलेली भारिप-बमसंची सत्ता कोसळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महापालिकेतील राजकीय परिस्थिती बिघडण्याची चिन्हे असून त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सत्तारूढ काँग्रेसमधील एक गट महाआघाडीच्या ढिसाळ कारभारावर नाराज आहे,
 गेल्या नऊ महिन्यांपासून स्विकृत सदस्यांची निवड घोषित न केल्याने काँग्रेसचे प्रदेशातील पदाधिकारीही नाराज असल्याची माहिती मिळाली.
या सर्व नाराजी नाटय़ामुळे अकोला महानगरपालिकेत पुढील वर्षांत सत्ताबदल होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.