शासन व साखर कारखानदारांकडून ऊसदर जाहीर होण्यातील विलंबाने ऊस उत्पादक संतप्त होऊ लागला असून, संघर्षांचा भडका उडण्याची भीती अधिक ठळक होऊ लागली आहे. आठ दिवसांपूर्वी म्हणजेच गत शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या गावी कराड येथे आक्रमक आंदोलन छेडून ऊस उत्पादकांची उच्चांकी गर्दी खेचल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निर्णयासाठी २४ नोव्हेंबरपयर्ंत देण्यात आलेली डेडलाईन संपत आली आहे.  दरम्यान, मुख्यमंत्री वा संबंधितांनी ऊसदरासाठी ठोस पावले न उचलल्याने स्वाभिमानीचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सभांपाठोपाठ सभा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या घरच्या मैदानावर तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शेतकऱ्यांची नाराजी शिगेला पोहचवण्याचा खटाटोप केला आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खासदार राजू शेट्टींना भेटीचे निमंत्रण दिल्यासंदर्भात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, राजू शेट्टी यांना मुख्यमंत्र्यांनी आवतन दिल्याचे खरे आहे. पण, आमचे रविवारपासून (दि. २४) कराड येथे होणाऱ्या आंदोलनाची हवा निघावी असा या मागचा डाव आहे. राजू शेट्टी यांनी अडीच हजारापेक्षा जादा ऊसदर देण्यासंदर्भात बोलणार असाल तर येईन अन्यथा आपल्या भेटीस येण्याची आवश्यकता नसल्याचा संदेश मुख्यमंत्र्यांना पाठवला असल्याचे पाटील यांनी सांगितले. आज दिवसभरात सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात अपवाद वगळता साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप झाले नाही. तर, ऊस वाहतूकही पूर्णत: ठप्प असल्याचा दावा त्यांनी केला. आज वाठार येथून निघालेल्या दुचाकी रॅलीने कराडात आगमन करण्यापूर्वी कृष्णा कारखान्यात ऊस वाहतूक व ऊसदरासंदर्भात निवेदन दिले. तर, कराड तहसीलदारांनाही निवेदन देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तहसील कचेरीत सह्याद्री कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनाही निवेदन देण्यात आले असून, त्यांनी ऊस गाळप बंद ठेवण्याचे मान्य केल्याचे पाटील यांनी सांगितले. आज दुपारी सातारा तालुक्यातील लिंब गावाजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या सहा ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले. यावेळी अजिंक्य साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांबरोबर वादावादीही होऊन अर्जुन साळुंखे, शंकर शिंदे व अन्य दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिल्याचे पंजाबराव पाटील यांनी सांगितले. कराड येथे आंदोलनास प्रशासनकर्ते जागा देण्यास तयार नाहीत. कराड तहसीलदारांनी कराडनजीकच्या आयटीआय कॉलेज येथे आंदोलनास जागा दिली आहे. मात्र, ही जागा अपुरी असल्याच्या कारणास्तव आम्ही त्यास नकार दिला आहे. कराडच्या कृष्णा घाटावरच आंदोलनासाठी आमची ठाम भूमिका राहणार आहे. वेळप्रसंगी येथे गनिमी काव्याने शिरकाव करून प्रीतिसंगमावरच आंदोलन छेडणार आहे. त्यावेळी पोलीस व प्रशासनाने आडमुठी भूमिका घेतल्यास प्रीतिसंगमाच्या पात्रात आंदोलन छेडले जाईल असा निर्वाणीचा इशारा पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.
 

More Stories onकराडKarad
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swabhimani claim sugarcane crushing still be in western maharashtra
First published on: 23-11-2013 at 02:15 IST