आजच्या संक्रमणाच्या काळात स्वामी विवेकानंदांच्या विचारांची अत्यंत आवश्यकता असून, त्यांचा तेजस्वी विचार घराघरांत पोहोचविण्यासाठी आयोजित जनजागृती मोहिमेत समाजाच्या सर्व घटकांतील सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन विवेकानंद रुग्णालयाचे संचालक डॉ. अशोकराव कुकडे यांनी केले.
स्वामी विवेकानंदांचे विचार समाजातील तळागाळापर्यंतच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या वतीने २०१३-२०१४ या स्वामीजींच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम-उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून स्वामी विवेकानंद सार्थ शती समारोह लातूर जिल्हा समितीच्या वतीने दयानंद शिक्षणसंस्थेच्या सभागृहात झाला.
या वेळी जिल्हय़ातील संस्थाचालकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत डॉ. कुकडे यांनी संस्थाचालकांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
घुसखोरी, धर्मातर, दहशतवाद यांसारख्या अनेक समस्यांनी देश ग्रस्त आहे. देश रसातळाला जाईल की काय, अशी भीती सर्वानाच भेडसावते आहे. अशा वेळी स्वामी विवेकानंदांचे विचारच सर्व समस्या दूर करू शकतील. यासाठी विवेकानंद सार्थ शती समारोह समितीच्या वतीने आयोजित उपक्रमात सर्वानी सर्व राजनैतिक मतभेद बाजूला सारून सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. कुकडे यांनी बैठकीत केले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी संस्थेच्या वतीने वर्षभर राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची बैठकीत माहिती दिली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परिसंवाद, चित्रप्रदर्शनी, स्वामीजींच्या साहित्याचे वितरण आदी अनेक कार्यक्रमांची योजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुनील देशपांडे, शिवाजी पाटील कव्हेकर, प्राचार्य गोविंद घारे, मंजुश्री वावरे, प्रा. रमेश जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. अतुल ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. परमेश्वर हासबे यांनी सूत्रसंचालन केले.