कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या विद्यमाने प्रकाशझोतात होणाऱ्या ’आयपीएल’च्या धर्तीवर कोल्हापूर प्रीमिअर लीग (केपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ ३० नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. विजेत्या संघास १ लाख रु पये, उपविजेत्या संघास ५० हजार रु पये व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेतून उभा होणाऱ्या निधीतून छत्रपती शिवाजी स्टेडियमवर दोन सिमेंटच्या तर चार टर्फच्या अशा एकूण सहा विकेट तयार करणे, सामनावीर खेळाडूस विविध स्पर्धेतून संधी उपलब्ध करून देण्याबरोबर बॉिलग मशिन खरेदी करण्याचा असोसिएशनचा मानस आहे
स्पर्धेदरम्यान खेळविण्यात येणाऱ्या ३१ सामन्यांतून खेळाडूंना नामवंत खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. यातील काही सामने हे दिवसरात्रीचे खेळविण्यात येणार असल्याने, प्रेक्षकांना स्थानिक पातळीवर ’आयपीएल’चा अनुभव घेता येईल. स्पर्धेतील  प्रत्येक सामनावीर खेळाडूस १५०० रु पये तर स्पर्धावीरास १५ हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. ही स्पर्धा तीन वर्षांसाठी नियोजित करण्यात आली आहे.
टी-२० क्रिकेट स्पर्धा म्हणजे निव्वळ करमणूक करणारा खेळ म्हणून न पाहता, या खेळाचे कौशल्य स्थानिक खेळाडूंना प्राप्त व्हावे, त्यातून त्यांच्या खेळाचा दर्जा सुधारावा या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘केपीएल टी-२०’ स्पर्धेसाठी खेळाडूंच्या निवडीचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. सुरुवातीला झालेल्या १४०० खेळाडूंच्या नोंदणीमधून १८० खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली. त्यामधून फ्रेंचाईज् मार्फत ‘गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ पूल फ्लेअर’ माध्यमातून आठ संघांच्या निवडीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
 १ ते ९ डिसेंबरदरम्यान ही स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडियम व शास्त्रीनगरच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहे. २९ नोव्हेंबरला असोसिएशनमार्फत शहरातून रॅली काढण्यात येणार असून, स्पर्धेचे उद्घाटन ३० नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे पाटणकर यांनी सांगितले
असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे उपाध्यक्ष व्ही. एम. भोसले, सचिव विजय भोसले, सहसचिव अभिजित भोसले, राहुल देसाई, जनार्दन यादव, केदार गयावळ, उदय जोशी, बापूसाहेब मिठारी, जयेश पाटील, गणेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.