ठाण्यातील एका घरात काचेच्या टाकीत असलेल्या एका माशाला चक्क कोंबडय़ाप्रमाणे तुरा असून या वैशिष्टय़ामुळे तो परिसरात कुतुहलाचा आणि आकर्षणाचे केंद्र बनला आहे. या माशाचे डोके तसेच पाठीवरील तुऱ्यास अँटिना नाव दिले आहे..
ठाणे येथील सावरकरनगरमधील इंद्रायणी सोसायटीमध्ये सचिन विष्णू गायकवाड राहतो. त्याला लहानपणापासूनच काचेच्या टाकीत मासे पाळण्याचा छंद असून त्याने आतापर्यंत विविध प्रजातीचे रंगीबेरंगी मासे पाळले आहेत. त्याच्याकडे अडीच आणि दीड फुटाच्या दोन काचेच्या टाक्या आहेत. सध्या त्याच्याकडे फ्लोरन या प्रजातीचा मासा आहे. नऊ महिन्यांपूर्वी जेव्हा त्याने तो विकत घेतला, तेव्हा हा मासा चार इंची होता. आता तो चांगला १० ते १२ इंची झाला आहे. नर जातीच्या या माशाचा रंग मोरपिशी आहे. त्याला बकऱ्याची कलेजी, कोळंबी आणि गप्पी मासे, असे खाद्य लागते. फ्लोरन मासा मांसाहारी असल्याने दुसऱ्या माशांवरही हल्ला करू शकतो. त्यामुळे त्याला अडीच फुटाच्या टाकीत स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहे, तर दीड फुटाच्या टाकीत फ्लोरन माशाची सुमारे दोनशे पिल्ले ठेवण्यात आली आहेत. अडीच फुटाच्या टाकीत स्वतंत्रपणे वावरणाऱ्या फ्लोरनच्या डोक्यावर तसेच पाठीवर तुरा आला आहे. त्यामुळे त्याचा तोरा भलताच वाढला असून सोसायटीमधील बच्चे कंपनी त्याला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत, असे सचिन गायकवाड यांनी सांगितले
 माशांना पर असतात, मात्र त्यांना तुरा येण्याचा प्रकार दुर्मीळ आहे. आजवर फ्लोरन या प्रजातीच्या माशाच्या डोक्यावर तसेच पाठीवर तुरा आल्याचे ऐकलेले नाही. त्यामुळे हा फ्लोरन दुर्मीळ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच या माशाच्या डोके व पाठीवरील तुऱ्यास अँटिना, असे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले.