संस्काराच्या मार्गावरील शिक्षक हा दीपस्तंभ, महत्त्वाचा भाग आहे. शाळा ही समाजापर्यंत पोहचण्याचे महत्त्वाचे माध्यम असून, शिक्षकांनी त्यासाठी सतत कार्यशील राहून विद्यार्थ्यांच्या मनाचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत प्रा. भरत कदम यांनी व्यक्त केले.
कराड येथे सांस्कृतिक स्रोत प्रशिक्षण केंद्र, नवी दिल्ली व जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वतीने सीसीआरटी शिक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी आनंद पळसे अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक एस. बी. मुळीक, प्रशिक्षण जिल्हाप्रमुख के. टी. सुतार, चित्रकार सागर बोंद्रे, यू.बी. विभूते यांची उपस्थिती होती.
प्रा. भरत कदम म्हणाले की, शिक्षकांना प्रशिक्षित करणे म्हणजे त्यांना नवसंजीवनी देण्यासारखे असल्याने त्यांनी याला संधी मानून आपल्या ज्ञानात भर टाकावी. प्रशिक्षणात मिळणाऱ्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांपुढे मार्गदर्शकांची भूमिका बजावावी. स्वत: नेहमी कार्यमग्न राहून समाजालाही कार्यक्षम बनवण्यासाठी काम करावे. शिक्षकांचे हात नेहमीच समाज घडवण्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे मुलांना आकार व दिशा देण्यासह त्यांच्यावर आदर्श संस्कार रुजण्यासाठी प्रयत्नशील राहावे.