गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात दूरध्वनी सेवा पूर्ण कोलमडली आहे. त्यामुळे दूरध्वनी ग्राहकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे. दूरध्वनी सेवा कोलमडल्याने संपर्क व्यवस्था मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाली आहे. दरम्यान, ही सेवा तातडीने सुरळीत करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने विभागीय दूरध्वनी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
भाजप जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, शहराध्यक्ष मनोज शर्मा, जिल्हा सचिव बी. डी. बांगर आदींनी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला. गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्य़ातील दूरध्वनी, मोबाइल, इंटरनेट सुविधा निकामी झाल्याने अनेकांना मनस्ताप होत आहे. व्यापारी क्षेत्रातील अनेक कंपन्या या क्षेत्रामध्ये सेवा देत असताना बीएसएनएलची सेवा विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे जिल्ह्य़ात पूर्णपणे कोलमडली आहे. सामान्य नागरिक, व्यापारी, बुकिंग सेवा यांचे व्यवहार, सुविधेवर चांगलाच प्रतिकूल परिणाम झाला आहे. बँकेची कनेक्टीव्हीटी बंद राहत असल्याने ग्राहक, खातेदार व दैनंदिन व्यवहार करणाऱ्यांची अडचण झाली आहे. शिक्षणक्षेत्रालाही याचा फटका बसत आहे.  
बीएसएनएलने दूरध्वनी सेवा त्वरित सुरळीत करावी, ग्राहकांना वेठीस धरण्याचे प्रकार बंद करावेत अन्यथा भाजपतर्फे जिल्हाभर बीएसएनएलच्या अकार्यक्षम कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.