जिल्ह्य़ात चार प्रादेशिक योजनांमधून सुमारे ७६ गावांचा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु गेल्या १० वर्षांपासून पाणीयोजना जिल्हा परिषदेने ताब्यात न घेतल्याने वाद कायम आहे. पाणीपुरवठय़ाबाबत जिल्ह्य़ात आता शिखर समिती स्थापन केली जाणार आहे.
चार योजनांकडे वीजदेयकाची सुमारे दोन कोटींवर थकबाकी आहे. जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आता लाभक्षेत्रातील सरपंच व ग्रामसेवकांना लेखी पत्र देऊन प्रादेशिक योजनेतून पाणीपुरवठा हवा की योजनेतून गाव वगळावे, या बाबत ग्रामसभा घेऊन निर्णय आठ दिवसांत कळविण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे आता पाणीपुरवठय़ावर शिखर समिती स्थापन होणार आहे. जिल्ह्य़ात २५ गावे मोरवाडी, २३ गावे सिद्धेश्वर, २० गावे पूरजल व ८ गावे गाडीबोरी या चार प्रादेशिक पाणीयोजना आहेत. यात ७६ गावांचा समावेश आहे. मात्र, योजना ताब्यात घेण्याविषयी जीवन प्राधिकरण व जि. प. प्रशासन यांच्यात वाद सुरू आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या नावाखाली या योजनेतून अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे चार योजनांकडे वीजदेयकापोटी दोन कोटींवर थकबाकी आहे. गेल्या ५ दिवसांपूर्वी वीज खंडित केल्याने आखाडा बाळापूरचा पाणीपुरवठा बंद आहे.
जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय अधिकाऱ्यांनी हिंगोली, सेनगाव तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे, जामरुण तांडा, जामरुण आंध, लोहगाव, पहेनी, सवड, नरसी नामदेव, केसापूर, घोटा आदी गावांना प्रादेशिक योजनेतून पाणीपुरवठा किंवा प्रादेशिक योजनेतून गाव वगळण्याबाबत येथील सरपंच व ग्रामसेवकांना गेल्या १६ नोव्हेंबरला पत्र दिले.
दरम्यान, जिल्ह्य़ातील चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वीजदेयकाची थकबाकी, देखभाल, दुरुस्तीमुळे आता चांगलीच अडचणीत सापडली आहे. जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व जीवन प्राधिकरणच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांच्या निमित्ताने जिल्ह्य़ात गावपातळीवर शिखर समिती स्थापन करण्यात येणार आहे. शिखर समितीचे अध्यक्ष सरपंच, तर समितीत ग्रामस्थांचा समावेश करून पाणीपुरवठय़ाची जबाबदारी सरपंचावर सोपविली जाणार असल्याचे सत्रांकडून समजले.