* महापे, शिरवणे, कोपरखैरणेतील रस्ते होणार चकाचक
* सुमारे ६० कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजुर
* डांबरीकरणासोबत कॉक्रिटीकरणाचाही प्रस्ताव
ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टयातील जर्जर झालेल्या रस्त्यांना नवा मुलामा चढविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने उशीरा का होईना पाउले उचलण्यास सुरुवात केली असून महापेपासून शिरवणेपर्यंतच्या विस्तीर्ण अशा औद्योगिक पट्टयात सुमारे ६० कोटी रुपये खर्च करुन नवे रस्ते बनविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. औद्योगिक पट्टयात महापालिका विकासकामे करत नाही, अशी ओरड या भागातील उद्योजकांकडून नेहमीच केली जाते. विकासकामे होत नसल्याने बहुतांश उद्योजकांनी महापालिकेचा कर भरायचा नाही, असे धोरण स्विकारले आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने कोपरखैरणे, महापे, घणसोली, शिरवणे अशा भागात नवे रस्ते, दिवाबत्ती, गटार बांधण्याची कोटय़वधी रुपयांची कामे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
आशिया खंडात मोठा मानल्या जाणाऱ्या ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टयात गेल्या अनेक वर्षांपासून पुरेशा सुविधांची वानवा आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या भागातील पायाभूत सुविधांकडे पाठ फिरवली असून गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेनेही या भागात ठोस अशी विकासकामे केलेली नाहीत. त्यामुळे या पट्टयात रस्ते, गटार, पदपथ अशा सुविधांचे अक्षरश तीनतेरा वाजले आहेत. औद्योगिक पट्टयातील उद्योजक आणि महापालिका यांच्यात गेल्या दीड दशकांपासून कर आकारणीवरुन वाद सुरु आहेत. महापालिका उद्योजकांना अव्वाच्या सव्वा कर आकारते, मात्र पुरेशा सुविधा पुरवत नाही, अशी उद्योजकांची तक्रार आहे. त्यामुळे उद्योजकांनी महापालिकेचा शेकडो कोटींचा कर थकवला आहे. विजय नहाटा यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाची सुत्र असताना त्यांनी या भागात सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार औद्योगिक पट्टयातील साफसफाईची कामे युद्धपातळीवर सुरु करण्यात आली. साफसफाई पाठोपाठ अभियांत्रीकी विभागाने औद्योगिक पट्टयातील शरपंजरी पडलेल्या रस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर यांनी वृत्तान्तला दिली. या आराखडय़ाची प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली असून फायझर ते मुकंद कंपनीपर्यतच्या रस्त्याचे पुर्णत कॉक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी सुमारे ११० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या मोटय़ा कामासोबत आता लहान औद्योगिक ब्लॉकमधील रस्त्यांची कामेही हाती घेण्यात येणार असून नुकत्याच झालेल्या महासभेत यासंबंधी सुमारे ६० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती डगावकर यांनी दिली. कोपरखैरणे, महापे, शिरवणे, घणसोली अशा वेगवेगळ्या औद्योगिक पट्टयातील रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यापैकी काही रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करण्यात येणार असून काही रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे, असे डगावकर यांनी स्पष्ट केले.