भरण्यास महापालिकेस असहकार करणाऱ्या ठाण्यातील व्यापाऱ्यांविरोधात महापालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली असून ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर दुकानांवर धाडसत्र सुरू केल्याने व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या पंधरवडय़ात महापालिकेने तब्बल दहा दुकानांवर धाडी टाकल्या असून या व्यापाऱ्यांनी किती कर बुडविला आहे, याची तपासणी सुरू केली आहे.
ठाणे महापालिकेत जकात बंद करून त्याऐवजी स्थानिक संस्था कर लागू करण्यात आला आहे. या नव्या करपद्धतीस शहरातील व्यापाऱ्यांकडून विरोध होऊ लागला होता. मध्यंतरी, शहरातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यामध्ये स्थानिक संस्था करातील सर्वच दर दोन टक्के करण्यासंबंधीचा प्रस्ताव व्यापाऱ्यांनी ठेवला होता. आयुक्त गुप्ता यांनी व्यापाऱ्यांच्या या प्रस्तावास मान्यता दिली होती. असे असले तरी व्यापाऱ्यांनी आधी स्थानिक संस्था कर भरावा आणि येत्या दोन महिन्यांत स्थानिक संस्था कराचे लक्ष्य पूर्ण करावे, अशी अट घातली होती. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही शहरातील काही व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कर भरण्यास नकारघंटा दाखविली. त्यामुळे महापालिकेला जकातीपोटी मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा स्थानिक संस्था करातून कमी उत्पन्न मिळाले. त्यामुळे महापालिकेचा आर्थिक डोलारा काहीसा कोसळू लागल्याचे चित्र होते. याच पाश्र्वभूमीवर महापालिकेने स्थानिक संस्था कर भरत नसलेल्या व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या. पण, तरीही व्यापारी ऐकत नसल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. त्यामुळेच महापालिका प्रशासनाने अशा व्यापाऱ्यांविरोधात आता कठोर पाऊले उचलत त्यांच्या दुकानांवर धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १५ दिवसांत जीवनज्योती गारमेंटस, त्रिमूर्ती वाइन्स, हस्तकला, क्लासिक लाइट, गोल्ड क्लासिक, सिरॅमिक वर्ल्ड आणि इतर अशा दहा दुकानांवर आतापर्यंत धाडी टाकण्यात आल्या आहेत. या व्यापाऱ्यांनी नेमका किती कर बुडविला आहे, त्याची तपासणी सुरू आहे, अशी माहिती स्थानिक संस्था कर उपायुक्त दिलीप ढोले यांनी दिली. तसेच स्थानिक संस्था कर भरत नसलेल्या व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्याचे सत्र सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.