ठाणेकरांना पाणी कपातीची झळ बसू नये यासाठी महापालिकेने शहरातील पाणी पुरवठय़ाचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच स्टेम कंपनीने पाणी कपात जाहीर केल्याने आठवडय़ातून दोन दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, वितरण व्यवस्थेचे नियोजन करत ठाणे शहर आणि घोडबंदर भागाचा पाणी पुरवठा १५ दिवसातून एकवेळा बंद राहील, असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच उंचावर असलेल्या वागळे इस्टेट परिसराला पाणी कपातीतून सूट देण्यात आली असून या भागाचा पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू राहील, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी वृत्तान्तला दिली.
कळवा-मुंब्रा आणि दिवा भागाला औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) पाणी पुरवठा करण्यात येतो. एमआयडीसीने पाणी कपात लागू केल्याने त्याचा फटका कळवा-मुंब्रा आणि दिवा भागाला बसणार असून या भागांचा पाणी पुरवठा आठवडय़ातून एकदा बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना असून त्यातून शहराला सुमारे २२० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होतो. यासाठी भातसा धरणातून पाणी उपसण्यात येते. उल्हास नदीतील पाण्याची पातळी खालावल्याने लघु पाटबंधारे विभागाने १५ टक्के पाणी कपात जाहीर केली आहे. त्यामुळे स्टेम आणि एमआयडीसीनेही पाणी कपात लागू केल्याने ठाणे शहरातील पाणी नियोजन सध्या महापालिकेच्या स्वतच्या पाणी योजनेतून सुरू झाले आहे. एमआयडीसीतील पाणी कपातीचा सर्वाधिक फटका कळवा-मुंब्रा तसेच दिवा भागाला बसला आहे. पाणी कपातीनंतरही ठाणे महापालिकेकडे मुबलक पाण्याचा साठा आहे. त्यामुळे शहराला पाणी टंचाईची झळ बसणार नाही, असे नियोजन सध्या केले जात आहे. महापालिका हद्दीत पाणी टंचाई जाणवू नये, यासाठी पाण्याचे विभागवार नियोजन करण्यात आले असून या नियोजनानुसार, घोडबंदर आणि ठाणे शहराचा पाणी पुरवठा १५ दिवसांतून एकदाच बंद राहणार आहे. तर वागळे इस्टेट परिसर हा उंचीवर असून या भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवल्यास पाणी पुरवठा करण्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पाणी कपातीतून या भागाला वगळण्यात आले आहे.
वागळे भागात पाणी पोहचविताना महापालिकेस बरीच कसरत करावी लागते. त्यामुळे या परिसरात पाणी कपात जाहीर केल्यास येथील वितरण व्यवस्था कोलमडून पडेल, अशी भीती अभियंत्यांना वाटत आहे. कळवा-मुंब्रा आणि दिवा भागात एमआयडीसीमार्फत पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, एमआयडीसीनेही पाणी कपात लागू केल्याने या भागाचा पाणी पुरवठा आठवडय़ातून एकदा बंद राहणार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.