औरंगाबादजवळील गोलवाडी, बनेवाडी शिवारात पाळीव प्राण्यांवर हल्ला करून दहशत निर्माण करणारा प्राणी तडस असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्राण्याने वासरावर हल्ला केला, त्या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी काही केस मिळून आले. ते प्रयोगशाळेत तपासनीस पाठविले असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच तो प्राणी कोणता, याचा उलगडा होणार आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून या प्राण्याने परिसरात चांगलीच दहशत निर्माण केली आहे. वन अधिकाऱ्यांनी मंगळवारी हा परिसर पिंजून काढला. परिसरातील लोकही डोळय़ांत तेल घालून रात्री-अपरात्री येथे कोणता प्राणी दिसतो का, याचा शोध चालविला आहे. सोमवारी रात्री एक शेळी फस्त करून ‘त्या’ प्राण्याने वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात वासरू जखमी झाले. सुदैवाने वेळीच लोक धावल्याने त्या प्राण्याच्या तावडीतून वासराची सुटका होऊ शकली. हल्ल्यात जखमी झालेल्या या वासराचे रक्त पडले, तेथे वन अधिकाऱ्यांना बुधवारी सकाळी काही केस आढळले. ते ताब्यात घेऊन विद्यापीठातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल आल्यानंतरच हल्ला करणारा प्राणी कोणता ते ठरविता येईल. दरम्यान, मंगळवारी रात्रीतून या परिसरात या प्राण्याने कोणताही हल्ला केला नसल्याची माहिती मिळाली. वन विभाग या भागात लक्ष ठेवून असल्याचे विभागाचे अधिकारी ओ. एस. चंद्रमोरे यांनी सांगितले.