शहरातील थत्ते नहर राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याचे प्राथमिक प्रकटन रद्द करण्याच्या सूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री चंद्रिकाकुमारी यांनी केली. बेगमपुरा, पहाडसिंगपुरा येथील नागरिकांनी या संदर्भात आक्षेप घेतले होते. एकूण १४ किलोमीटरची लांबी असणाऱ्या थत्ते नहरीच्या भोवतालचे १०० मीटर अंतरात काहीही बांधकाम करण्यास या निर्णयामुळे बाधा झाली असती. त्यामुळे खासदार चंद्रकांत खैरे यांनी पुढाकार घेऊन थत्ते नहर राष्ट्रीय स्मारक होऊ नये, या साठी आक्षेप नोंदविले होते. थत्ते नहर राष्ट्रीय स्मारक होण्याअगोदर हा पाण्याचा प्रवाह ३ मीटपर्यंत बाधित क्षेत्र धरावे, असा आक्षेप प्रारूप आराखडय़ात नोंदविण्यात आला होता. नहरीच्या परिसरातील १०० मीटरचे अंतर संरक्षित करण्याऐवजी ३ मीटपर्यंत संरक्षित करावे, अशी मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने केंद्रीय सांस्कृतिक मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक दिल्ली येथे घेण्यात आली. बैठकीत थत्ते नहरचे प्राथमिक प्रकटन रद्द केले जाईल, असे केंद्रीय मंत्री चंद्रिकाकुमारी यांनी सांगितल्याची माहिती खैरे यांनी दिली.