सावेडीतील महापालिकेच्या बहुचर्चित नियोजित नाटय़गृहाची निविदा अखेर प्रशासनाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवली. सभा बोलावून समितीने आता त्यावर त्वरीत निर्णय घेणे अपेक्षित असून तसे लवकर झाले तर नाटय़गृहाच्या कामाला येत्या काही महिन्यात सुरूवात होऊ शकते.
सलग ४ वेळा निविदा प्रसिद्ध करूनही नाटय़गृहाच्या कामासाठी मनपाला प्रतिसाद मिळाला नव्हता. मनपाच्या नाजूक आर्थिक स्थितीमुळे अलीकडे ही वेळ मनपावर वारंवार येते. सावेडीतील या नियोजित नाटय़गृहाला सरकारचे २ कोटी रूपयांचे अनुदान आहे. मात्र एवढय़ा पैशात नाटय़गृह होणार नाही म्हणुन काम खासगीकरणाचा घाट घातला गेला. तो अयशस्वी झाल्यावर पुन्हा मनपानेच बांधकाम करायचा निर्णय झाला. वाढीव कामासाठी होणाऱ्या खर्चाला मनपाकडे निधी नसल्यामुळेच निविदेला प्रतिसाद मिळेनासा झाला.
एकूण ८ कोटी २५ लाख रूपयांचा हा प्रस्ताव आहे. त्यात नाटय़गृह, एक छोटेखानी सभागृह अशी रचना आहे. सरकारचे अनुदान फक्त २ कोटी रूपये आहे. त्यातील ६० लाख रूपये गेली २ वर्षे मनपाकडे पडून आहेत. मनपाची या कामाबाबत इतकी उदासिनता आहे की जिल्हाधिकाऱ्यांकडून हे ६० लाख रूपये वर्ग करून घेण्याचे मनपा विसरून गेली व ही रक्कम परत सरकारजमा झाली. लोकसत्ता नेच त्यावेळी मनपाच्या या नियोजनशून्य कारभारावर प्रकाश टाकला होता. कसेबसे ते ६० लाख रूपये पुन्हा मनापकडे जमा झाले असून त्यालाही आता दीड वर्ष उलटून गेले आहे.
दरम्यानच्या काळात मनपाकडून निविदा प्रसिद्ध केली जात होती मात्र तिला प्रतिसाद मिळत नव्हता. अखेरीस ५ व्या वेळी नगरमधील ए. सी. कोठारी या फर्मने ही निविदा दाखल केली आहे. एकूण ५ कोटी ५० लाख रूपयांची फक्त नाटय़गृह बांधकामाची निविदा मनपाने प्रसिद्ध केली होती. कोठारी कंपनीने ती १४ टक्के जादा दराने दाखल केली आहे. कारण निविदा जुन्या दरांनुसार प्रसिद्ध झाली होती. तरीही सध्याच्या जिल्हा दर सुचीबरोबर तुलना केली असता ही निविदा ९ टक्के जादा दराची असल्याची माहिती मिळाली. ४ वेळा प्रतिसादन मिळाला नाही तर ५ व्या वेळी एकच निविदा आली तरीही ती पात्र ठरते या नियमाचा आधार घेत प्रशासनाने ही निविदा स्थायी समितीकडे पाठवली आहे.
स्थायी समितीने आता यावर निर्णय घ्यायचा आहे. समितीने यापुर्वीच्या जकात, पारगमन तसेच रस्ता बाजू शुल्क वसुली याबाबतच्या निविदांमध्ये घातलेला घोळ लक्षात घेता नाटय़गृहाच्या या निविदेवर काय निर्णय होईल हा प्रश्नच आहे. सावेडीतील सध्याच्या क्रिडा संकुलाच्या जागेवर हे नियोजित नाटय़गृह आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2013 रोजी प्रकाशित
नाटय़गृहाची निविदा स्थायी समितीला सादर
सावेडीतील महापालिकेच्या बहुचर्चित नियोजित नाटय़गृहाची निविदा अखेर प्रशासनाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवली. सभा बोलावून समितीने आता त्यावर त्वरीत निर्णय घेणे अपेक्षित असून तसे लवकर झाले तर नाटय़गृहाच्या कामाला येत्या काही महिन्यात सुरूवात होऊ शकते.
First published on: 26-03-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theatres statement submit to standing committee