बाळासाहेब विखे यांचा दुष्काळ दौरा
निळवंडे धरणाच्या कालव्यांना आमचा विरोध असल्याच्या वावडय़ा विनाकारण उठवल्या जात आहेत. पुणे जिल्ह्यातील धरणांना पैसे मिळतात, मग निळवंडे धरणासाठी का मिळत नाहीत; असा सवाल ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केला. निळवंडे धरणासाठी सरकारकडे पैसे नाहीत असे पाटबंधारे मंत्र्यांनी सांगितले तर केंद्राकडून पैसे आणण्यासाठी आपण पुढाकार घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.
विखे यांनी आज तालुक्यातील गोगलगाव, िपप्रीलौकाई, आडगाव बुद्रुक-खुर्द, खडकेवाके, कोऱ्हाळे आदी गावामध्ये दुष्काळ पहाणी दौरा केला. यादरम्यान नागरीकांशी संवाद साधताना त्यांनी निळवंडे धरणाचा आग्रह धरला. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, सभापती निवास त्रिभुवन, उपसभापती सुभाष विखे, तहसीलदार आप्पासाहेब िशदे, गटविकास अधिकारी कमलाकर रणदिवे, उपविभागीय कृषि अधिकारी सुधाकर बोराळे आदी यावेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, निळवंडे धरणाचा निधी अन्यत्र वापरल्याने कामाला विलंब झाला आहे. जी धरणे बांधून झाली, अशा धरणांच्या देखभालीसाठी मोठा निधी राखीव ठेवला आहे. नव्या धरणांच्या देखभालीला निधी कशासाठी पाहिजे, असा सवाल करुन हे पैसे नव्या धरणांसाठी वापरा अशी सूचना त्यांनी केली. ते म्हणाले, उद्योगांना लागणाऱ्या पाण्यासाठी बीओटी तत्वावर धरणे बांधावीत. निळवंडे धरण पुर्णपणे ठिबकवर केले तर जागतिक बँक पैसे द्यायला तयार होईल. मात्र खरी मेख वेगळीच आहे. आपले पाणी आपल्याला मिळणार नसेल, तर पाटबंधारे मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू असा इशाराही विखे यांनी यावेळी दिला.
खासदार वाकचौरे म्हणाले, निळवंडे धरणाचे काम सुरु होवून दोन पिढय़ा संपल्या. आताही जुन्याच ठेकेदाराला कालव्यांची कामे दिल्याने मंद गतीने कामे सुरु असून, धरणाच्या कामांना
विखेंचा विरोध नाही. विलंबाला अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. केंद्राकडे दिलेला १ हजार ८१० कोटींचा प्रस्तावच अपूर्ण असल्याने निधी मिळण्यास अडचणी आहेत. बाळासाहेब विखे आणि मी दोघेही हा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन त्यांनी दिले.